आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची तरतूद जितक्या लवकर सुरु करता येईल तितकी फायद्याची असते. त्यासाठी काही महत्त्वाचे गुंतवणूक पर्यायांचा तुम्हाला विचार करता येईल. या पर्यायातील गुंतवणूक दीर्घकाळात तुमच्या मुलांच्या आर्थिक अडचणी दूर करुन त्यांना सुरक्षित करेल.
पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरते. दिवसेंदिवस वाढणारी महागाई लक्षात घेऊन त्यानुसार गुंतवणूक आज काळाची गरज बनली आहे. त्यामुळे वर्तमानासोबत भविष्यही सुकर जाईल. आज मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
Table of contents [Show]
मुदत ठेव (Fixed Deposit)
तुम्हाला कोणतीही जोखीम न घेता आणि सुरक्षित गुंतवणूक करायची असल्यास मुदत ठेव हा योग्य पर्याय आहे. यामध्ये तुम्ही 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. मुलांच्या भविष्यासाठी मुदत ठेवीचा पर्याय निवडणार असाल तर तुम्हाला त्यावर 2.90 टक्के ते 5.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. जवळपास सर्वच बँकांमध्ये ठेवींचे विविध मुदतीचे पर्याय उपलब्ध आहेत.
म्युच्युअल फंड (Mutual Fund)
जर तुम्ही जोखीम घेण्यास तयार असाल तर तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणूकीचा योग्य पर्याय ठरेल. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी सुरु करू शकता. यामध्ये कमीत कमी 100 रूपयांपासूनही गुंतवणूक करता येते. हा गुंतवणूकीचा योग्य पर्याय ठरू शकतो.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुम्ही पीपीएफ (PPF – Public Provident Fund) चा विचार करू शकता. यामध्ये कमाल 15 वर्ष तुम्ही गुंतवणूक करू शकता. पीपीएफमध्ये 7.1 टक्के व्याजदर मिळू शकतो. मात्र पीपीएफ अल्प बचत योजनांच्या श्रेणीमध्ये असल्याने त्यावर प्रत्येक तिमाहीत केंद्र सरकारकडून व्याजदर निश्चित केला होता. मागील दोन वर्षांत पीपीएफवरील व्याजदरात कपात झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana (SSY))
तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत Sukanya Samriddhi Yojana (SSY) गुंतवणूक करू शकता. आपल्या मुलीचे वय 10 वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही हे खाते उघडू शकता. या योजनेत तुम्हाला दरवर्षी 250 रुपयांपासून जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. मुलगी 14 वर्षांची होईपर्यंत या खात्यात पैसे गुंतवता येतात. मुलगी 18 वर्षांची होताच तुम्ही या खात्यातून अंशतः रक्कम काढू शकता. मुलगी 21 वर्षांची होताच ती या खात्यातील सर्व रक्कम काढू शकते.
भरवशाची गुंतवणूक अर्थात सोने ( Investment in Gold)
मुलांसाठी गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात तर मग तुम्ही सोन्यातील गुंतवणुकीचा मार्गही निवडू शकता. प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक न करता ई-गोल्ड किंवा गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये (ETF) गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. सोने हे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून परिचित आहे. मंदी किंवा आर्थिक संकटात सोन्याचा भाव वाढतो. शिवाय सोने केव्हाही विकून गुंतवणूक काढून घेता येते. त्यामुळे सोन्यामधील गुंतवणूक सोपी आणि सुटसुटीत आहे.