Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Children with Special Needs: दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना खर्चाचे नियोजन कसे कराल? वाचा

Special Childs

Image Source : https://www.freepik.com/

दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना नेहमीच्या तुलनेत अतिरिक्त पैसे खर्च होत असतात. त्यामुळे पालकांनी सुरुवातीपासूनच खर्चाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याबाबत काळजी असते. मात्र, मूल दिव्यांग असल्यास पालकांना त्यांच्या भविष्यासोबतच आरोग्य, शिक्षण अशा विविध गोष्टींबाबत विशेष लक्ष द्यावे लागते. दिव्यांग मुलांचा सांभाळ करणे हे अनेकबाबतीत आव्हानात्मक ठरते. यातील सर्वात आव्हानात्मक बाब म्हणजे आर्थिक नियोजन.

दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना नेहमीच्या तुलनेत अतिरिक्त पैसे खर्च होत असतात. त्यामुळे पालकांनी सुरुवातीपासूनच खर्चाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. या लेखातून दिव्यांग मुलांच्या दैनंदिन खर्चाचे योग्यप्रकारे नियोजन कसे करू शकता, याविषयी जाणून घेऊया.

पालकांची भूमिका महत्त्वाची

दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना पालकांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते. इतरांच्या तुलनेत अशा मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे 18-20 वर्षांपर्यंत मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी पालकांवर असते. परंतु, दिव्यांग मुलांच्याबाबतीत ही जबाबदारी आयुष्यभर पार पाडावी लागते

पालकांनी दिव्यांग मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणे व त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आई-वडिल दोघेही कामाची विभागणी करून मुलाचा सांभाळ करू शकतात. वर्क फ्रॉम होम अथवा फ्लेक्झिबल वर्कचा पर्याय निवडू शकतात. पालक अशा मुलांसाठी होमस्कूलिंगचा पर्याय निवडू शकतात. 

खर्चाची आकडेवारी

वैद्यकीय खर्चदिव्यांग मुलांचा सांभाळ करताना येणाऱ्या खर्चात याचा वाटा सर्वाधिक असतो. नियमितपणे डॉक्टरांची भेट घेणे, थेरपी, औषधे, वैद्यकीय उपकरणे,विम्याचा हफ्ता अशा विविध गोष्टींवर दरमहिन्याला जवळपास 3 ते 5 हजार रुपये खर्च होतात.
शिक्षणइतर मुलांप्रमाणेच दिव्यांग मुलांसाठीही शिक्षण तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यांच्यासाठी अनेक चांगल्या शाळा उपलब्ध आहेत. याशिवाय, होम स्कूलिंगचाही पर्याय पालकांसमोर असतो. मात्र, शिक्षक, विशेष शाळा व शालेय साहित्य यासाठी महिन्याला 2 ते 3 हजार रुपये खर्च येऊ शकतो.
इतर खर्चवैद्यकीय व शिक्षणासोबतच मुलांसाठीच्या दैनंदिन गरजा पूर्ण करताना हजारो रुपये खर्च होतात. उपकरणे जसे की व्हीलचेअर, श्रवणयंत्रासाठी खर्च येतो. काही मुलांना विशेष पौष्टिक आहाराची गरज असते. याशिवाय, वाहतूक सेवेसाठीही खर्च येतो. अशाप्रकारे, दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना दरमहिन्याला सर्वसाधारणपणे 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो. 

खर्चाचे नियोजन करण्यासाठी टिप्स

आधीपासूनच करा बचतपालकांनी आपले मूल दिव्यांग आहे हे लक्षात येताच, बचत करण्यास सुरुवात करायला हवी. खर्च व बचतीची योग्यप्रकारे सांगड घालणे आवश्यक आहे. तसेच, इतर अनावश्यक खर्च टाळायला हवा.  
विमा अत्यंत महत्त्वाचादिव्यांग मुलांचा सांभाळ करताना सर्वाधिक खर्च औषधे व उपचारावर होतो. त्यामुळे विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे. विम्यामुळे तुमचे महिन्याला हजारो रुपये वाचतील.
सरकारी योजनांचा घ्या फायदासरकारद्वारे दिव्यांग मुलांसाठी विविध योजना व कार्यक्रम राबवले जातात. अशा योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
स्कॉलरशिपविविध खासगी संस्था व शाळांद्वारे मुलांना स्कॉलरशिप दिली जाते. स्कॉलरशिपचा लाभ घेतल्यास मुलांच्या शिक्षणसाठी होणारा खर्च वाचेल.

तुमच्यानंतर मुलांची जबाबदारी कोणावर?

आपल्यानंतर दिव्यांग मुलांचा सांभाळ कोण करणार? अशी चिंता पालकांना सतत सतावत असते. त्यामुळे यासाठीचे नियोजन आधीपासूनच करायला हवे. इच्छापत्राच्या मदतीने तुम्ही मालमत्ता व इतर संपत्ती मुलांच्या नावावर करू शकता. मुलांचा सांभाळ करण्यासाठी गार्डियनची (पालक) नेमणूक करावी. खासगी ट्रस्ट तयार करून त्यामध्ये पैसे जमा करू शकता. या ट्रस्टच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणपासून ते आरोग्यापर्यंतचा सर्व खर्च पूर्ण होऊ शकेल. 

लक्षात ठेवा की, दिव्यांग मुलांसाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजन अत्यंत गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे दिव्यांग मुले नोकरी करू शकत नसल्याने त्यांचा उत्पन्नाचा मार्ग बंद असतो. त्यामुळे पालकांनी त्यांच्या दैनंदिन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे.