सध्या बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबामधील लोकांकडे चारचाकी गाड्या आहेत. मुळात कारचा वापर हा अलीकडच्या काळात जीवनशैलीचाच एक भाग म्हणून गणला जात आहे. बरेचजण नवीन कार खरेदी करण्याऐवजी जुन्या कारची खरेदी करतात. विशेष म्हणजे ही कार चांगल्या कंडिशनमध्ये आणि कमी किंमतीत उपलब्ध होते.
जुन्या वाहनांची खरेदी करण्यासाठी सुद्धा बँकेकडून वाहन कर्ज (Vehicle Loan) उपलब्ध करून दिले जाते. मात्र नवीन वाहन कर्जावरील व्याजदरापेक्षा, जुन्या वाहनांसाठी घेतलेल्या कर्जावर जास्त व्याजदर आकारला जातो. त्यामुळे ही कर्ज घेताना जास्तीत जास्त प्रीपेमेंट करणे आणि अल्पमुदतीची व कमी व्याजदराची कर्ज घेणे गरजेचे आहे. जर तुम्हीही जुन्या कारची खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी 4 गोष्टी तपासून पाहणे गरजेचे आहे. त्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
क्रेडिट स्कोअर तपासून बजेट निश्चित करा
तुम्हीही जुनी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील, तर तुम्ही वाहन कर्ज (Vehicle Loan) घेऊ शकता. हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर (Cibil Score) सुरुवातीला तपासावा लागेल. तुमचा क्रेडिट स्कोअर उत्तम असेल, तर तुम्हाला सहज कमी वेळेत वाहन कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
कोणतेही जुने वाहन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमचे बजेट निश्चित करणे गरजेचे आहे. तुमची सध्याची आर्थिक स्थिती काय आहे, तुम्ही किती रुपयांचे कर्ज काढू शकता आणि किती रकमेचे प्रीपमेंट करू शकता याचे कॅल्क्युलेशन तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. तुम्ही जेवढे जास्त प्रीपमेंट कराल आणि जेवढ्या कमी रकमेचे कर्ज घ्याल तेवढाच तुमचा फायदा होईल.
कागदपत्र जमा करणे
जर तुम्ही वाहन कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला ठराविक कागदपत्र बँकेला सादर करावी लागतील. ज्यामध्ये ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड,पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणत्याही एका कागदपत्राची निवड करावी लागेल. तर उत्पन्नाचा पुरावा म्हणून पेमेंट स्लिप, आयटी रिटर्न्स, फॉर्म 16 यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल. तसेच रहिवासी पुराव्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल इत्यादी कागदपत्रांपैकी कोणत्याही एका कागदपत्राला सादर करावे लागेल.
विचारपूर्वक कर्जाचा कालावधी निवडा
वाहन कर्ज घेताना कर्जाचा कालावधी योग्य पद्धतीने निवडणे गरजेचे आहे. जर तुम्ही दीर्घकाळासाठी वाहन कर्ज घेतले, तर तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होईल मात्र व्याजदर वाढणार आहे. याउलट अल्पमुदतीचे कर्ज घेतले, तर कर्जाचा हप्ता ठराविक कालावधीसाठी वाढेल, मात्र कमीत कमी व्याजदर भरावे लागेल.
डाऊनपेमेंट करा
वाहन कर्ज घेताना तुम्ही किती रकमेचे डाऊन पेमेंट करणार आहात आणि किती रकमेचे कर्ज घेणार आहात याचे कॅल्क्युलेशन तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. तुम्ही जितक्या जास्त रकमेचे डाऊन पेमेंट कराल, तितक्या कमी रकमेचे कर्ज तुम्हाला घेता येईल.
साहजिक तुमचे कर्जही लवकर फिटेल आणि कमीत कमी व्याजदर भरावा लागेल. तुमच्या वाहनाच्या एकूण किमतीच्या किमान 15 ते 30 टक्के डाऊन पेमेंट तुम्ही करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमचा मासिक हप्ता कमी होईल आणि तुमच्यावरील आर्थिक ताण कमी होईल.
Source: hindi.financialexpress.com