Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Legal Property Documents: मालमत्ता खरेदी करताना ‘या’ कायदेशीर बाबी तपासायलाच हव्यात!

Legal Property Documents

Legal Property Documents: साधी भाजी खरेदी करताना आपण अनेकदा भाजी तपासून घेत असतो, मग घर खरेदी करताना तर आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. घर खरेदी हे अनेकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करत असताना काही कायदेशीर बाबी देखील जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. चला तर मग, या लेखात जाणून घेऊयात की घर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची माहिती करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.

आपलं स्वतःचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. स्वतःच्या मालकीचं घर असावं म्हणून पै पै साठवून लोक बचत करत असतात. सर्वसामान्य लोक आयुष्याची कमाई घरासाठी लावत असतात. तेव्हा घर खरेदी करताना घरासंबंधी सर्व गोष्टींची कसून चौकशी, तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे.

साधी भाजी आणायला बाजारात गेल्यावर आपण भाजी कितीवेळा तपासून घेत असतो, मग घर खरेदी करताना तर विशेष काळजी घ्यायला हवी. चला तर मग, या लेखात जाणून घेऊयात की घर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची माहिती करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून नंतर आपल्याला त्रास व्हायला नको.

बिल्डर माहिती  (Verification of Seller)

तुम्ही घर घेत असाल किंवा फ्लॅट घेत असाल किंवा जमिनीचा व्यवहार करत असाल अशावेळी तुमच्याशी व्यवहार करणारा व्यक्ती नेमका कोण आहे, त्याला मालमत्ता विक्रीचा अधिकार आहे किंवा नाही हे तपासून घेतलं पाहिजे. यासाठी परिसरातील रहिवाशांना देखील तुम्ही विचारात घेतलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही खरेदी करण्याआधी तेथे काही वाद तर नाही ना याची देखील तुम्हांला कल्पना येईल.

जागेची मालकी  (Title Verification)

ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे जी तुम्हांला माहितीच असायला हवी. ज्या जागेवर घर संकुल बनत आहे,ती जागा नेमकी कुणाची आहे? कुणाच्या नावावर आहे? बिल्डरने ती खरेदी करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही? हे सगळे प्रश्न आपण विचारलेच पाहिजेत. यात काही गडबड वाटल्यास लागलीच वकिलांचा, जाणकारांचा सल्ला घ्या. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणी टळू शकतात. जागेसंबंधित प्रत्येक कागदपत्रांची शहानिशा करणं अतिमहत्वाचं आहे.

जमिनीचे कागदपत्रे (Land Use Documents)

खरेदी करणाऱ्या मालमत्तेची कागदपत्रे यापासूनच घेतली पाहिजे. खरेदी करणारे घर, फ्लॅट ज्या जमिनीवर आहेत, त्या जमिनीशी संबंधित माहिती जाणून घ्या. घर, फ्लॅट ज्या जागेवर उभे आहे तो प्लॉट NA (Non Agriculture) आहे की नाही हे तपासून घ्या. अनेकदा ज्या जागेवर ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा इतर स्थानिक प्रशासनाने आरक्षण (सार्वजनिक उद्यान, ग्रंथालय, स्मशानभूमी इत्यादी) टाकले आहे,त्या जागा देखील काही विकासक अनैतिक पद्धतीने विकताना दिसतात. त्यामुळे जमीन खरेदी करताना आपले मेहनतीचे पैसे देण्याआधी कागदपत्रे तपासून घ्या.

बांधकामाची मंजूरी (Construction Approval)

निवासी किंवा व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या बांधकामांना भारत सरकारची मान्यता आवश्यक आहे. सरकारी मान्यता न घेता बांधकाम केल्यास ते पाडण्याचे अधिकार देखील सरकारकडे असतात हे लक्षात असू द्या. नदी किनारी, वन विभागाशेजारी किंवा संरक्षित स्मारकाजवळ जर तुम्ही मालमत्ता खरेदी करणार असाल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. विकासकाने स्थानिक प्राधिकरणांकडून योग्य त्या परवानग्या मिळवल्या आहेत की नाही याची खात्री करूनच व्यवहार करा.
जर तुम्ही रिसेल प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर आधीच्या प्रॉपर्टी मालकाकडून ही कागदपत्रे न चुकता मागवून घ्या.

भोगवटा प्रमाणपत्र (Certificate of Occupancy)

भोगवटा प्रमाणपत्र हे आणखी एक दस्तऐवज आहे जे बांधकामाच्या मंजुरीइतकेच महत्त्वाचे आहे. भोगवटा प्रमाणपत्र स्थानिक प्रशासनाद्वारे जारी केले जाते. हे प्रमाणपत्र सांगते की एखादी विशिष्ट इमारत सरकारी नियमांचे पालन करते आणि ती भोगवटासाठी योग्य आहे. हे प्रमाणपत्र स्थानिक नगरपालिका, ग्रामपंचायत आदी प्राधिकरणाद्वारे जारी केले जाते.

जागेची पाहणी (Property survey)

केवळ विकासकांच्या ऑफिसमध्ये बसून घराचे, फ्लॅटचे व्यवहार करू नका. ज्या जागेवर घर बांधले गेले आहे, तिथे प्रत्यक्ष जाऊन भेट द्या आणि बांधकामाची माहिती घ्या. यासाठी तुम्ही सिव्हिल इंजिनिअरची मदत घेऊ शकता. बांधकामाची गुणवत्ता याद्वारे तुम्हांला तपासून घेता येईल. बांधकाम प्रक्रिया सुरू असतानाच तुम्हांला बांधकामात काही बदल सुचवायचे असतील तर तेही तुम्ही सांगू शकाल. वाहन पार्किंग, लिफ्ट, पाण्याची सोय, दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता या गोष्टी जेव्हा तुम्ही जागेची पाहणी कराल तेव्हाच तुम्हांला समजून येतील. त्यामुळे जागेची पाहणी न करता जर व्यवहार करत असाल तर ते शहाणपणाचे ठरणार नाही हे लक्षात असू द्या.

RERA नोंदणी (RERA Registration)

बांधकाम क्षेत्रात वाढते गैरव्यवहार लक्षात घेता 2017 साली भारत सरकारने एका प्राधिकरणाची स्थापना केली. हे प्राधिकरण 'रियल इस्टेट नियामक प्राधिकरण (RERA) म्हणून ओळखले जाते. बांधकाम क्षेत्राशी निगडित मंजूरीसाठी या प्राधिकरणाकडे नोंदणी करणे आवश्यक असते. विकासकाची सत्यता, बांधकामाशी संबंधित सर्व प्रशासकीय मंजुरी, बँकेशी निगडित आर्थिक व्यवहार या सगळ्यांची माहिती RERA ला देणे बंधनकारक आहे. विकासक आणि ग्राहक यांच्यातील वाद देखील RERA द्वारे सोडवले जातात. त्यामुळे खरेदी करत असलेले घर, फ्लॅट RERA नोंदणीकृत आहे की नाही हे तपासूनच घ्यायला हवे.

वर सांगितलेल्या मुद्द्यांचा विचार करून जर व्यवहार केले तर अनावश्यक समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता तुम्ही टाळू शकता. आपले हक्काचे, मेहनतीचे घर कुठल्याही वाद-विवादात अडकू नये यासाठी आपण जागरूक असणं गरजेचं आहे.