Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Planning for Education Loan: शैक्षणिक कर्ज घेण्याच्या विचारात आहात? अशी करा तयारी...

Education Loan

Image Source : www.bankofbaroda-fiji.com

शैक्षणिक कर्ज घेण्याआधी काही गोष्टींची तुम्हाला पूर्वतयारी करावी लागेल. आधीच नियोजनपूर्वक काम केल्यास ऐनवेळी धावपळ होणार नाही आणि सुरळीत शैक्षणिक कर्जाची अर्ज प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते. यासाठी खाली दिलेल्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता.

सध्या महागाईचा परिणाम आता शिक्षणव्यवस्थेवर देखील जाणवू लागला आहे. शिक्षण घेणं आता काही साधंसोपं राहिलेलं नाही. आपल्या मुलाबाळांना शिक्षणाच्या योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालक जीवाचे रान करत असतात. कधी कधी पैशाची निकड देखील जाणवते. म्हणूनच जसे गृहकर्ज, वाहनकर्ज लोक सहज घेतात तसं शैक्षणिक कर्ज देखील लोक आता घेऊ लागले आहेत. तुम्ही देखील शिक्षणासाठी शैक्षणिक लोन घेण्याच्या विचारात असाल तर हा लेख वाचलाच पाहिजे.

शैक्षणिक कर्ज घेण्याआधी काही गोष्टींची तुम्हाला पूर्वतयारी करावी लागेल. आधीच नियोजनपूर्वक काम केल्यास ऐनवेळी धावपळ होणार नाही आणि सुरळीत शैक्षणिक कर्जाची अर्ज प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते. यासाठी खाली दिलेल्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता.

कर्ज कुठून घ्यावं?

कुठलेही कर्ज घेताना कोणतीही बँक तुमचे आतापर्यंतचे आर्थिक व्यवहार कसे होते ते बघते. शैक्षणिक कर्जात विद्यार्थ्याचे पालक हे सह-कर्जदार असतात. पालकांची आर्थिक शिस्त असलेला कशी आहे हे बँकांना ‘सिबिल स्कोअर’ वरून सहज ओळखता येते. त्यामुळे पालकांनी त्यांचा सिबिल स्कोअर कायम उत्तम असेल याची काळजी घ्यायाची आहे. शैक्षणिक कर्ज घेत असाल तर आधीच्या सगळ्या कर्जाचे हफ्ते, क्रेडीट वेळेवर भरत आहात ना याची खात्री करून घ्या. त्यादृष्टीने शैक्षणिक कर्ज देणाऱ्या विविध बँका आणि वित्तीय संस्थांकडे चौकशी सुरु करा. तुमच्या सिबिल स्कोअरनुसार तुम्हाला वेगवेगळ्या व्याजदरात कर्ज दिले जावू शकते. हे सगळे लक्षात ठेऊन वेगवगेळ्या बँकाचे व्याजदर, त्यांच्या कर्ज परतफेडीचे पर्याय, कर्जाच्या अटी आणि इतर गोष्टींबद्दल माहिती जाणून घ्या.

किती कर्ज हवं?

ज्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही कर्ज घेणार आहात त्यासाठी आवश्यक ट्यूशन फी, निवास खर्च, पुस्तके आणि इतर संबंधित खर्चांसह तुमच्या  एकूण खर्चाचा अंदाज लावा. तसेच काही शिष्यवृत्ती, अनुदान कुठली संस्था, ट्रस्ट देते का ते देखील बघा. त्यामुळे तुमची कर्जाची रक्कम कमी होऊ शकते. हे पर्याय कर्ज घेण्याच्या आधीच तपासून घेतले पाहिजेत. तुमच्या आजवरच्या बचतीचा देखील हिशोब ठेवा, गरज नसताना अतिरिक्त कर्ज घेऊ नका. कर्जाचा आणि व्याजाचा बोजा टाळण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करा .

पात्रता निकष काय?

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बँकेचे निकष वेगवेगळे आहेत याची माहिती असायला हवी. मान्यतापात्र अभ्यासक्रमांसाठीच केवळ कर्ज दिले जाते हे लक्षात असू द्या. तसेच विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थ्याचे पालक हे शैक्षणिक कर्जात सह-अर्जदार असतात, त्यामुळे पालकांचे आर्थिक निकष देखील महत्वाचे असतात.

bank-2-1.jpg

आवश्यक कागदपत्रे आहेत ना?

शैक्षणिक कर्ज घेताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे तयार ठेवा. ऐनवेळी धावपळ नको असेल तर कागदपत्रांची जुळवाजुळव आधीच होणे गरजेचे आहे. साधारणपणे खाली दिलेली कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • प्रवेशाचा पुरावा: ऑफर लेटर किंवा शैक्षणिक संस्थेकडून प्रवेश निश्चिती.
  • ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स.
  • पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, लाईट बिल किंवा भाडे करार.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे: 10वी आणि 12वी इयत्तेची मार्कशीट आणि ग्रॅज्युएशन मार्कशीट (लागू असल्यास).
  • उत्पन्नाचा पुरावा: इन्कम टॅक्स रिटर्न, सॅलरी स्लिप किंवा सह-अर्जदाराचे (म्हणजेच पालकांचे)  बँक स्टेटमेंट.
  • संपत्ती दस्तऐवज (Collateral Documents, लागू असल्यास): हे कर्जाच्या रकमेवर अवलंबून असते, कर्जाची रक्कम खूप जास्त असेल तर तारण म्हणून ठेवण्यासाठी मालमत्ता दस्तऐवज जसे की घर, शेती, जमिनीची कागदपत्रे इत्यादी.

परतफेड कशी कराल?

शैक्षणिक कर्ज घेण्यापूर्वी, परतफेडीची स्पष्ट योजना असणे आवश्यक आहे. कर्जाची रक्कम, व्याज दर आणि कर्जाचा कालावधी यावर आधारित अंदाजे मासिक EMI किती असेल याचा अंदाज घ्या. तुमच्या शिक्षणानंतरच्या उत्पन्नाच्या शक्यतांचा देखील विचार करा आणि परतफेडीची रक्कम तुमच्या बजेटमध्ये आरामात बसेल याची खात्री करा. सध्या रोजगाराच्या संधी सहजासहजी उपलब्ध होत नाही हे लक्षात असू द्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच चांगल्या पगाराची नोकरी लागेल याची शाश्वती नाही. त्यामुळे कर्जाच्या परतफेडीचे  पुरेसे नियोजन करणे गरजेचे आहे.

कर्ज प्रक्रिया आणि मंजूरी

तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घ्यायचे ठरवले आहे त्या बँकेच्या शाखेला भेट द्या किंवा त्यांच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन शैक्षणिक कर्ज घेण्यासाठीचा अर्ज भरा. वर दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्वतःकडे तयार ठेवा. कर्जाचा अर्ज अचूकपणे भरा, त्यात कुठलीही चूक होणार नाही याची खात्री करा. नाही तर चूक सुधारण्यात तुमचा अतिरिक्त वेळ जावू शकतो.

एकदा कर्ज अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्ही दिलेल्या कागदपत्रांची बँक शहानिशा करेल. त्यांना त्याविषयी आणखी काही कागदपत्रे, पुरावे आवश्यक असतील तर बँक तुम्हाला तसे कळवेल. या प्रक्रियेस थोडा वेळ लागू शकतो, म्हणून प्रतीक्षा कालावधीसाठी तयार रहा.

तुमचा कर्जाचा अर्ज मंजूर झाल्यास, बँक कर्जाची रक्कम, व्याजदर आणि अटींचा उल्लेख असलेले मंजूरी पत्र तुम्हाला जारी करेल. एकदा तुम्ही अटी व शर्ती स्वीकारल्यानंतर, आवश्यकतेनुसार कर्जाची रक्कम थेट शैक्षणिक संस्थेला किंवा तुमच्या बँक खात्यात वितरित केली जाईल. अनेक प्रकरणात थेट शैक्षणिक संस्थेला बँक पैसे पाठवते.  बँकेने कर्ज  वितरणासाठी मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्ही सबमिट केल्याची खात्री करून घ्या.

परतफेड महत्वाची! 

तुमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, कर्जाची परतफेड सुरू होण्यापूर्वी साधारणत: एक वाढीव कालावधी बँकाकडून दिला जातो. हा वाढीव कालावधी वेगवेगळ्या बँकांसाठी वेगवेगळा असू शकतो. साधारणपणे 6 महिने तर 1 वर्षापर्यंतचा कालावधी हा कर्जाच्या परतफेडीसाठी दिला जातो.

शैक्षणिक कर्ज घेण्याच्या तयारी तुम्ही जर करत असाल तर त्यासाठी सखोल संशोधन, नियोजन आणि विविध घटकांचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो. शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी पात्रता निकष समजून घेऊन, आवश्यक कागदपत्रे गोळा करून आणि परतफेड योजना तयार करून तुम्ही शैक्षणिक कर्ज मिळवू शकता.