भारतात 1991-92 ला खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाउजा) हे आर्थिक धोरण भारतानं स्वीकारलं. त्यांनतर देशविदेशातल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारताची बाजारपेठ खुली झाली. कधी नव्हे ते अमेरिकेत, फ्रान्स आणि इटलीसारख्या देशांत खाल्ले जाणारे खाद्यपदार्थ भारतात मिळू लागले.
मॅकडोनाल्ड, डॉमिनोज, केएफसी सारखे आंतराष्ट्रीय ब्रँड अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस पडले. या सगळ्यांत मोठा नफा कमावला तो मॅकडोनाल्ड या ब्रँडने. 1996 साली मुंबईत मॅकडोनाल्डचं पहिलं रेस्टॉरंट खुलं झालं. अमेरिकेतही लोकप्रिय असलेल्या या बर्गर ब्रँडबद्दल जाणून घेऊया…
Table of contents [Show]
अमेरिकेत मॅकडोनाल्डची सुरुवात
1948 साली अमेरिकेतल्या शिकागो इथं मिल्कशेक विकणाऱ्या रिचर्ड जेम्स (डीक) आणि मॉरिस जेम्स (मॅक) या दोन भावंडांनी मिळून मॅकडोनाल्ड नावाने छोटंसं दुकान सुरू केलं. तात्काळ सेवा देणारं हे छोटंसं दुकान तुफान लोकप्रिय बनलं. अमेरिकन व्यावसायिक रे क्रोक यांना या दुकानाने भुरळ घातली.
रिचर्ड आणि मॉरिस जेम्स बंधूंना भेटून क्रोक यांनी फ्रँचायजी सुरू करण्याचा सल्ला दिला. जेम्स बंधूंनी या योजनेला होकार दिला आणि 1954 मध्ये रे क्रोक हे मॅकडोनाल्डचे फ्रँचायजी एजंट बनले. पुढे 6 वर्षांनी म्हणजे 1961 साली 2.7 दशलक्ष डॉलर किंमतीत क्रोक यांनी मॅकडोनाल्डची मालकी मिळवली.
जागतिक स्तरावर मॅकडोनाल्डच्या जवळपास 38,000 फ्रँचायजी आहेत. जगभरातल्या 118 देशांमध्ये 680 लाख लोकांना ते सेवा पुरवतात. मुख्य म्हणजे एकूण फ्रँचायजीपैकी 93% फ्रँचायजी मॅकडोनाल्डच्या मालकीच्या आहेत.
मॅकडोनाल्ड हे बर्गर, पिझ्झा, कॉफी आणि इतर खाद्यपदार्थांसाठी ओळखले जात असले तरी त्यांचा मुख्य व्यवसाय हा बांधकाम आणि जमिनीशी संबंधित आहे हे तुम्हांला माहिती आहे का?
अनेकांना याची कल्पना नसेल कारण हॉटेल, रेस्टॉरंट म्हणूनच आपण मॅकडोनाल्डची प्रतिमा आपल्या डोक्यात पक्की केलेली आहे. परंतु या लेखात मॅकडोनाल्डचं बिजनेस मॉडेल काय आहे हे आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.
काय आहे मॅकडोनाल्डचं बिजनेस मॉडेल?
मॅकडोनाल्ड ही कंपनी खरं तर बांधकाम क्षेत्रातून नफा कमावते. ही कंपनी मोक्याच्या ठिकाणी जागा खरेदी करते, त्यावर इमारत बांधते आणि त्यातील काही जागा मॅकडोनाल्डची फ्रँचायजी म्हणून गुंतवणूकदारांना भाडेतत्वावर देते.
म्हणजेच काय तर मॅकडोनाल्ड सर्वात मोठी गुंतवणूक आणि नफा हा बांधकाम क्षेत्रातून कमवते. उत्पादन खर्च कमी आणि नफा अधिक या तत्वावर ही कंपनी काम करते. एकूण महसुलापैकी 82% नफा हा फ्रँचायजीमधून कमावला जातो असे मॅकडोनाल्ड कॉर्पच्या अहवालात म्हटले आहे.
मॅकडोनाल्डच्या फ्रँचायजीला मागणी का?
हॉटेल व्यवसायात वस्तूवरील नफा किती हे पाहिले जाते. प्रचंड भाडे देऊन लोक फ्रँचायजी का घेतात याचे सोपे उत्तर म्हणजे ब्रँड! जागतिकीकरण झाल्यानंतर अधिकांश लोकांना ब्रँडेड वस्तूंची सवय लागली आहे. त्यासाठी ते पैसे खर्च करण्यास तयार असतात.
नेमकी ही गोष्ट मॅकडोनाल्डने हेरली असून बर्गर, पिझ्झा, कॉफी, कोल्ड ड्रिंक सारख्या कमी भांडवल लागणारे पेय आणि खाद्यपदार्थ 50% नफ्याने विकली जातात. याचा थेट फायदा कंपनीला आणि फ्रँचायजी चालकाला होत असतो. त्यामुळे सुरुवातीची फ्रँचायजी घेण्यासाठीची गुंतवणूक मोठी असली तरी नियमित उत्पन्नाचे साधन म्हणून मॅकडोनाल्ड यशस्वी ठरले आहे.
फ्रँचायजी घेण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता लागेल?
1. तुमच्याकडे $250,000 ते $500,000 इतकी रक्कम हवी.
2. $1,700,000 रुपयांचे कर्ज घेण्याची ऐपत हवी. (म्हणजेच त्या किंमतीची मालमत्ता तुमच्याकडे हवी)
3. फ्रँचायजीसाठी अर्ज करताना $45,000 इतकी रक्कम भरण्याची तयारी हवी.
4. फ्रँचायजी मिळाल्यानंतर 9 महिन्यांचे प्रशिक्षण घेण्याची तयारी हवी.
5. ज्या जागेवर फ्रँचायजी घेणार आहात त्या जागेसाठी 20 वर्षांचा करार करण्याची तयारी हवी
6. मासिक विक्रीनुसार ठरवलेले भाडे देण्याची तयारी हवी
7. मॅकडोनाल्ड फ्रँचायजी घेतलेल्या जागेवर इंटेरियर कंपनीच्या निर्देशानुसार स्वतःच करावे लागणार.
या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यास जर तुम्ही सक्षम असाल तर तुम्हांला हमखास मॅकडोनाल्डची फ्रँचायजी मिळू शकते.
2021 च्या मॅकडोनाल्ड कॉर्पच्या अहवालानुसार कंपनीची एकूण मालमत्ता 53.8 अब्ज डॉलर इतकी प्रचंड आहे.
कंपनीचा विक्री महसूल जवळपास 9.7 अब्ज डॉलर्स इतका आहे. फ्रँचायजीमधून 13 अब्ज डॉलर्स तर भाडे स्वरूपात कंपनीला 8.3 अब्ज डॉलर इतके प्रचंड उत्पन्न मिळते.
मॅकडोनाल्डचे हे बिजनेस मॉडेल अजूनही अनेकांना माहिती नाही. एकाच व्यवसायातून वेगवेगळ्या पद्धतीने उत्पन्न मिळवण्याची ही पद्धत अनेक कंपन्या आता वापरत आहे. परंतु मॅकडोनाल्डने आतापर्यंत जो काही नफा याद्वारे कमावला आहे त्याची बरोबरी अजून कुठल्याही कंपनीला करता आलेली नाही.