Non-Callable FD Rule Change: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरूवारी (दि. 26 ऑक्टोबर) मुदत ठेवींच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार गुंतवणूकदारांना आता 1 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींमधील (Fixed Deposit-FD) पैसे मुदतीपूर्वी काढता येणार आहेत.
आरबीआयच्या नियमानुसार पूर्वी नॉन-कॉलेबल मुदत ठेवींची मर्यादा 15 लाख रुपये होती. नॉन-कॉलेबल मुदत ठेवी म्हणजे मुदत ठेवींचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी त्यातून पैसे काढण्याची मर्यादा. पूर्वी 15 लाखांपर्यंतच्या मुदत ठेवींमधून मुदत पूर्ण होण्यापूर्वी पैसे काढता येत होते. आरबीआयने यामध्ये वाढ केली असून, आता 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीमधून मुदतीपूर्वी पैसे काढता येणार आहे.
बँका ग्राहकांना दोन प्रकारच्या मुदत ठेवींची सुविधा पुरवते. त्यातील पहिला प्रकार म्हणजे, कॉलेबल (Callable). यामध्ये एफडीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी पैसे काढता येतात आणि दुसरा प्रकार म्हणजे, नॉन-कॉलेबल (Non-Callable). नॉन-कॉलेबल प्रकारामध्ये कालावधी पूर्ण होण्यापूर्वी एफडीमधून पैसे काढता येत नाहीत.
आरबीआयने गुरूवारी (दि. 26 ऑक्टोबर) प्रसिद्ध केलेल्या नोटीफिकेशननुसार, नॉन-कॉलेबल मुदत ठेवींची मर्यादा आता 15 लाखावरून 1 कोटी रुपये करण्यात आली आहे. हा नियम एनआरई (Non-Resident External) आणि एनआरओ (Non-Resident Ordinary) अशा दोन्ही खातेधारकांना लागू असणार आहे.