Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

CEO of FedEx: केमिकल इंजिनिअर ते FedEx कंपनीचे सीइओ; राज सुब्रमण्यम यांची नेटवर्थ जाणून घ्या

Raj Subramaniam

Image Source : www.currentaffairs.adda247.com

राज सुब्रमण्यम यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर IIT मुंबईतून बी. टेक इन केमिकल इंजिनिअरिंग ही पदवी घेतली. 1987 साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर Syracuse University ची शिष्यवृत्ती मिळाल्याने ते अमेरिकेला गेले. 30 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते फेडेक्स कंपनीत कार्यरत आहेत.

CEO of FedEx: परदेशात राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या तसेच भारतीय नागरिकांनी कॉर्पोरेट जगतात उंच झेंडा रोवला आहे. मायक्रोसॉफ्ट सीइओ सत्या नाडेला, गुगलचे सुंदर पिचाई, अडोबी कंपनीचे प्रमुख शंतनू नारायण यांच्यासह इतरही अनेक व्यक्ती मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा कारभार यशस्वीरित्या सांभाळत आहेत. त्यातील आणखी एक नाव म्हणजे राज सुब्रमण्यम. केमिकल इंजिनिअर ते अमेरिकेतील बलाढ्य FedEx कंपनीचे सीइओ पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणार आहे.

राज सुब्रमण्यम हे मुळचे केरळमधील आहेत. ते सध्या FedEx या मालवाहतूक आणि इ-कॉमर्स सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे सीइओ (FedEx CEO Raj Subramaniam) आहेत. तसेच ते कंपनीचे अध्यक्षही आहेत. 2022 साली त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. फेडेक्स कंपनीचा वार्षिक महसूल 9 हजार कोटी डॉलरपेक्षाही जास्त आहे. फेडेक्स ग्रूप अंतर्गत येणाऱ्या सर्व कंपन्यांचा कारभार राज सुब्रमण्यम पाहतात. या कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतील टेनेसी राज्यातील Memphis शहरात आहे.

राज सुब्रमण्यम यांचे शिक्षण आणि करिअर

राज सुब्रमण्यम यांनी केरळमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयआयटी मुंबईतून बी. टेक इन केमिकल इंजिनिअरिंग ही पदवी घेतली. 1987 साली त्यांना ही पदवी मिळाली. त्यानंतर Syracuse University ची शिष्यवृत्ती मिळाल्याने ते अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स पूर्ण केले. त्यानंतर व्यवस्थापन शास्त्रातील MBA ही पदवी देखील घेतली.

1991 साली त्यांनी फेडएक्स कंपनीत मार्केटिंग अॅनलिस्ट पदापासून कामास सुरुवात केली. पुढील काही वर्षात त्यांनी आपल्या कामाच ठसा उमटवत नाव कमावले. 1996 साली ते मार्केटिंग विभागाचे उपाध्यक्ष झाले. संपूर्ण आशिया-पॅसिफिक विभागातील मार्केटिंगचे काम ते पाहू लागले. 2018 मध्ये त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 2020 मध्ये त्यांची संचालक मंडळावर नियुक्ती झाली.

2022 साली फेडेएक्स कंपनीचे संस्थापक Fred Smith निवृत्त झाल्यानंतर ते कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कारभार पाहू लागले. फेडेक्स कंपनीच्या विविध उद्योगांचे प्रमुख म्हणून ते काम करत आहेत. 30 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी फेडेक्स कंपनीत काम केले आहे. त्यामुळे इ-कॉमर्स आणि मालवाहतूक व्यवसायातील बारकावे त्यांना माहिती आहेत.

राज सुब्रमण्यम यांची संपत्ती आणि पगार

2022 पासून ते अध्यक्ष आणि सीइओ पदाचा कारभार पाहत आहेत. तेव्हापासून त्यांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे. 2022 या वर्षात त्यांनी एकूण 49,74973 डॉलर्स कमावले. यामध्ये 11 लाख डॉलरपेक्षा जास्त पगाराच्या स्वरुपात मिळाले. तर 15 लाख डॉलरपेक्षा जास्त बोनस मिळाला. तसेच कंपनीच्या शेअर्समध्ये भागीदारीही मिळाली. विविध स्रोतांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार राज सुब्रमण्यम यांची संपत्ती 13.5 मिलियन डॉलर इतकी आहे.