Agniveer Reservation in BSF: केंद्र सरकारने लष्करामध्ये जवानांची भरती करण्यासाठी अग्नीवीर योजना मागील वर्षी सुरू केली. या याजनेंतर्गत फक्त 4 वर्ष (टूर ऑफ ड्यूटी) लष्करात सेवा करता येणार आहे. या योजनेला मोठा विरोध झाला होता. मात्र, सरकारने योजना मागे घेतली नाही. अग्नीवीर म्हणून लष्करातून निवृत्त झाल्यानंतर दुसरे कोणते काम करणार? हा प्रश्न तरुणांपुढे होता. मात्र, आता त्यावर तोडगा काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. अग्नीवीर निवृत्त झाल्यानंतर जवानांना सीमा सुरक्षा दलात (Border Security Force - BSF) 10% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
सोबतच बीएसएफमध्ये भरती होताना कमाल वयाच्या मर्यादेतही अग्नीवीरांना सूट मिळणार आहे. जवान कोणत्यावर्षी लष्करात भरती झाला आहे, त्यावरुन ही सूट मिळेल. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत पत्रक जारी केले आहे. त्यानुसार आता बीएसएफमध्ये भरती होण्याबाबतच्या नियमांत केंद्र सरकार बदल करणार आहे.
बीएसएफमध्ये भरती होण्याच्या वयोमर्यादेत सूट
बीएसएफमधील राखीव जागांवर जे अग्नीवीर भरतीसाठी जातील त्यांच्यासाठी वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे. शिपाई म्हणजेच कॉन्स्टेबल पदासाठी हे बदल करण्यात आले आहेत. अग्नीवीरच्या पहिल्यात बॅचमध्ये भरती होऊन निवृत्त झालेल्या जवानाला 5 वर्षापर्यंत वयामध्ये सूट मिळणार आहे.
शारीरिक चाचणी माफ
सोबतच अग्नीवीरांसाठी शारीरिक क्षमता चाचणीही माफ करण्यात आली आहे. अग्नीवीर म्हणून भरती होणाऱ्या जवानांपैकी फक्त 25% जवान चार वर्षांनंतर सेवेत सामावून घेतले जाणार आहेत. उर्वरित जवानांना निवृत्त व्हावे लागेल. या नियमांमुळे अग्नीवीर योजनेवर मोठी टीका झाली होती. लष्करात जाण्यास उत्सुक असलेल्या तरुणांनी याचा विरोध केला होता. देशातील अनेक शहरांमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते.
CAPF आणि आसाम रायफल्समध्येही राखीव जागा
केंद्रीय निमलष्करी दल आणि आसाम रायफल्समध्येही अग्नीवीरांसाठी 10% राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. (Agniveer Reservation in CAPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात (CAPF) भरती होण्यासाठी सध्या वयोमर्यादा 17 ते 22 वर्ष आहे. मात्र, अग्नीवीर 26 वर्षांपर्यंत CAPF मध्ये अर्ज करू शकतो. लष्करामध्ये अग्नीवीर म्हणून भरती होण्यासाठी कमाल वयोमर्यादा 23 वर्ष आहे. त्यानंतर चार वर्ष अग्नीवीर म्हणून सेवा केल्यानंतर निमलष्करी दलात अर्ज करू शकतो. अग्नीवीर म्हणून पहिल्या बॅचमध्ये भरती झालेल्या जवानांना 28 वर्षापर्यंत CAPF आणि आसाम रायफल्समध्ये राखीव 10% कोट्याचा लाभ घेता येईल.
लष्करातील कठोर प्रशिक्षण आणि खडतर कामामुळे जवानांचा फिटनेस चांगला असते. हे जवान कोणतीही आव्हाने पेलण्यास समर्थ असतील. त्यामुळे याचा फायदा निमलष्करी दलांनाच होईल. निमलष्करी दलात सुमारे 73 हजार पदे रिक्त आहेत. या जागा जलद भरल्या जातील. तसेच अग्नीवीर जवानांना प्रशिक्षण देण्याचा खर्च आणि वेळही वाचेल.
सूचना - ही बातमी सर्वप्रथम ANI न्यूज वरती प्रसिद्ध झाली आहे.