Tomato Supply: टोमॅटोचे दर कडाडल्याने केंद्र सरकारचे देखील टेंशन वाढले आहे. त्यामुळे हैराण झालेल्या केंद्र सरकारने आता महाराष्ट्र सरकार कडून टोमॅटो खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून टोमॅटो खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही राज्यांमधून टोमॅटो विकत घेऊन केंद्र सरकार राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटो उपलब्ध करुन देणार आहे.
बाजार समित्यांमधून टोमॅटो खरेदी
केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाच्या आदेशानुसार,राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (National Agricultural Co-operative Marketing Federation) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघामार्फत (National Consumer Co-operative Federation) आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजार समित्यांमधून टोमॅटो खरेदी केले जाणार आहे.
दिल्लीत होणार पुरवठा
तसेच, गेल्या महिन्यात ज्या - ज्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर सरासरी किमतीपेक्षा जास्त होते, अशा शहरांमध्ये हा टोमॅटो साठा वितरित केल्या जाणार आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये टोमॅटोचे दर प्रतिकिलो 150 रुपयांपेक्षा जास्त असल्याने, इतर राज्यांमधून खरेदी केलेल्या टोमॅटोचा साठा दिल्ली आणि नजीकच्या क्षेत्रातील ग्राहकांना सवलतीच्या दरात दिल्या जात आहे.
दर नियंत्रणात येण्याची शक्यता
महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये होत असलेला टोमॅटोचा पुरवठा या महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेल, अशी आशा आहे. महाराष्ट्र राज्याशिवाय आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक येथे टोमॅटोचे पिक घेतले जाते. तसेच, पुढल्या महिन्यात महाराष्ट्रातील नाशिक, नारायणगाव आणि औरंगाबाद येथून लवकरच नव्या पिकाची आवक सुरु होईल. तसेच आंध्र प्रदेशातूनही नव्या पिकाची आवक सुरु होईल अशी अपेक्षा आहे. तेव्हा असे झाल्यास दर नियंत्रणात येऊ शकतात, असे ग्राहक कल्याण मंत्रालयाचे मत आहे.