अंदमान आणि निकोबार बेटांवर एक सुसज्ज पोर्ट विकसित केले जाणार आहे. केंद्र सरकारकडून ग्रेट निकोबारच्या गलाथिया बे (Galathea Bay of Great Nicobar) या ठिकाणी कंटेनरसाठी पोर्ट उभारले जाणार आहे. या कामासाठी नुकताच केंद्र सरकारकडून 41000 कोटींची निविदा काढण्यात आली. आज शनिवारी 28 जानेवारी 2023 रोजी टेंडर काढण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.
येत्या 2028 पर्यंत हे कंटेनर पोर्ट विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या पोर्टची क्षमता 4 मिलियन टीईयू इतकी असेल. त्यानंतर टप्प्याटप्याने ही क्षमता 16 टीईयू इतकी वाढवली जाणार आहे.
केंद्र सरकारकडून अंदमान आणि निकोबार बेटांवर विकास कामे केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये एक सुसज्ज पोर्ट विकसित केले जाणार असल्याचे केंद्रीय बंदरे आणि जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले. अंदमानमधील पोर्टमुळे मालवाहतुकीला चालना मिळणार आहे. दक्षिण आशियात जलवाहतुकीने व्यापार करणाऱ्यांसाठी अंदमानमधील पोर्ट फायदेशीर ठरेल, असे सोनोवाल यांनी सांगितले.
पर्यटकांची आवडती ठिकाणे
केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटे सुट्टीत वेळ घालवण्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. पर्यटक येथे येतात आणि शांतता आणि विश्रांतीचा अनुभव घेतात. अंदमान आणि निकोबार हा 572 लहान आणि मोठ्या बेटांचा समावेश असलेला बेट समूह आहे, ज्यामध्ये फक्त काही बेटांवर लोक राहतात. पोर्ट ब्लेअर ही बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला हिंदी महासागरात स्थित अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे.
राधानगर बीच, हॅवलॉक बेट: या समुद्रकिनाऱ्याला आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. नीलमणी पाणी आणि पांढरी वाळू असलेला हा एक प्राचीन समुद्रकिनारा आहे.
सेल्युलर जेल, पोर्ट ब्लेअर: हे काळा पाणी म्हणूनही ओळखले जाते, हे पोर्ट ब्लेअरमध्ये स्थित एक जुने वसाहती कारागृह आहे. पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे. हे कारागृह ब्रिटिशांच्या माध्यमातून वसाहती राजवटीत बांधण्यात आले.