बांधकाम उद्योगातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे सिमेंट. मागील काही महिन्यांपासून सिमेंटच्या किंमतींचा आलेख वरती जात आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून सिमेंटच्या किंमती वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत सुमारे 16 रुपये प्रति बॅग भाववाढ झाल्यानंतर आता पुन्हा 10 ते 15 रुपये सिमेंटचे भाव वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Table of contents [Show]
पश्चिम आणि मध्य भारतात किंमती स्थिर
एमकाय ग्लोबल फायनान्शिअर सर्व्हिसेस कंपनीने आपल्या अहवालात याबाबत माहिती दिली आहे. पश्चिम आणि मध्य भारतातील राज्यात किंमती स्थिर असल्या तरी उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतामधील राज्यांमध्ये किंमती वाढतील, असेही अहवालात म्हटले आहे. सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांना येत्या वर्षात जास्त नफा मिळेल. भाववाढ झाल्याचे परिणाम पुढील आर्थिक वर्षात दिसून येतील, अशी शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे.
भारतातील सिमेंट कंपन्या
अल्ट्राटेक सिमेंट, अंबुजा, एसीसी, जेपी सिमेंट, रॅमको, जेके सिमेंट, श्री सिमेंट या भारतातील आघाडीच्या सिमेंट उत्पादक कंपन्या आहेत. यासह इतरही अनेक कंपन्या सिमेंट निर्मिती क्षेत्रात आहेत. सिमेंटच्या किंमती वाढल्यानंतर त्याचा परिणाम बांधकाम आणि पायाभूत सुविधा निर्मितीवरही होऊ शकतो. रस्ते,पूल, धरण, मोठे प्रकल्प यासह खासगी सार्वजनिक बांधकाम क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात सिमेंट लागते. सिमेंटच्या किंमती वाढल्या तर या प्रकल्पांना लागणारा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
सिमेंटचे सध्याचे दर अंदाजे (43 Grade)
कंपनी | सिमेंटचा भाव |
अल्ट्राटेक सिमेंट | 330 रुपये. |
अंबुजा सिमेंट | 330 रुपये. |
एसीसी सिमेंट | 370 रुपये. |
बिर्ला सिमेंट | 325 रुपये |
जेपी सिमेंट | 370 रुपये |
रेपो रेट वाढल्याने गृहकर्ज महागणार
रिझर्व्ह बँकेने नुकताच रेपो रेट वाढवला आहे. त्यामुळे बँकांनीही व्याजदर वाढवल्याने आता गृहकर्ज घेताना जास्त इएमआय द्यावा लागणार आहे. गृहनिर्माण क्षेत्र व्याजदर वाढीमुळे आधीच अडचणी आले असताना आता सिमेंटच्या किंमतवाढीमुळे बांधकाम खर्च आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने अन्न धान्यासह अन्य वस्तूंच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. किरकोळ बाजारात इतरही वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. जवळपास सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. असे असताना आता सिमेंटच्या दरामध्येही वाढ होणार आहे. यामुळे आपसूकच घरांच्या किंमतीदेखील वाढण्याची शक्यता आहे.