ऊर्जा संवर्धन आणि विजेची बचत व्हावी यासाठी काम करणाऱ्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी (BEE) या संस्थेच्या कक्षेत सिलिंग फॅन निर्मिती कंपन्यांना आणण्यात आले आहे. 1 जानेवारीपासून फॅन कंपन्यांनाही ऊर्जा वापराबाबतचे लेबल फॅनवर लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे फॅन्सच्या किंमती ८ ते २० टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एखादे उपकरण किती ऊर्जा वाचवते हे त्यावर लावण्यात आलेल्या स्टार रेटिंगद्वारे समजते. ५ स्टार असतील तर ५० टक्क्यांपर्यंत ऊर्जेची बचत होऊ शकते. तर कमीत कमी १ स्टार असेल तर उपकणाद्वारे ३० टक्के विजेची बचत होते.
फॅन निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपन्या हॅवल्स, उषा आणि ओरियंट इलेक्ट्रिक कंपन्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, या निर्णयामुळे फॅन्सच्या किंमती ८ ते २० टक्क्यांपर्यंत वाढू शकतील, असेही म्हटले आहे. ५ स्टार रेटिंग फॅन्ससाठी उच्च दर्जाची मोटार आणि इतर इलेक्ट्रिक पार्ट्स लागू शकतात, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे.
उत्पानद प्रक्रियेचा खर्च वाढणार
फॅनच्या किंमती कमीत कमी वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील. मात्र, काही अतिरिक्त खर्च ग्राहकांनाही सोसावा लागेल. सात ते आठ टक्क्यांपर्यंत किंमत वाढ रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ओरियंट इलेक्ट्रिक कंपनीचे सीइओ राकेश खन्ना म्हणाले. जी फॅन्सची मॉडेल्स स्टार रेटिंगमध्ये मोडत नाहीत त्यांच्यामध्येही कंपनीला काही बदल करावे लागतील. निर्मिती प्रक्रियेतही काही बदल होतील, असेही खन्ना म्हणाले. १ स्टार फॅनच्या किंमती ७ ते ८ टक्क्यांनी वाढू शकतात, तसेच ५ स्टार फॅनच्या किंमती २० टक्क्यांनी वाढू शकतात, असे उषा फॅन्स कंपनीचे सीइओ दिनेश छाब्रा यांनी म्हटले.
फ्रिजच्याही किंमती वाढल्या
ब्युरो ऑफ इनर्जी इफिशिअन्सीने (BEE) फ्रिजबाबच्या नियमांतही बदल केल्याने 5 टक्क्यांपर्यंत किमती वाढू शकतात, असे उत्पादक कंपन्यांचा अंदाज आहे. गोदरेज, हायर, पॅनासॉनिक या रेफ्रिजरेटर उत्पादक कंपन्यांच्या म्हणण्यानुसार २ ते ५ टक्क्यांपर्यंत किमती वाढतील. रेफ्रिजरेटरमधील अती थंड ठेवणारा कप्पा म्हणजे फ्रिजरला सुद्धा किती ऊर्जा खर्च होते, याचे वेगळे लेबल कंपन्यांना लावावे लागणार आहे. एकूणच फ्रिजला किती ऊर्जा लागते यासाठीही एक वेगळे लेबल असेल. 'ऊर्जा वापराबाबतचे नियम कठोर केल्यामुळे वस्तूची किंमतीही वाढते. इन्सुलेशन टिकवून ठेवण्यासाठी अधिकचा खर्च येऊ शकतो, असे गोदरेज अप्लायन्स उद्योगाचे व्हाइस प्रेसिडेंट कमल नंदी यांनी म्हटले.