कारची ऑनलाइन विक्री करणाऱ्या कारदेखो समूहाला आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 246 कोटींचा तोटा झाला. या वर्षात कंपनीला तोटा कमी करण्यात यश आले. वर्ष 2020-21 मध्ये कंपनीला 341 कोटींचा तोटा झाला होता. कारदेखो ग्रुप तोट्यात असला तरी गेल्या आर्थिक वर्षात महसुलात मोठी वाढ झाली आहे. कंपनीला आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1598 कोटींचे उत्पन्न मिळाले.
कंपनी कार आणि बाइक्सची ऑनलाइन विक्री करते. यात इलेक्ट्रिक कार आणि बाइक्सचा समावेश आहे. याशिवाय ग्राहकांना कारची निवड करणे सोपे जावे यासाठी कार मॉडेल्सच्या कामगिरीचा आढावा, त्यावर संशोधन आणि अतिरिक्त माहिती उपलब्ध करुन देते. वाहन विमा, ब्रोकिंग आणि वित्त पुरवठा यामध्ये देखील कारदेखो काम करते. वर्ष 2022 मध्ये कंपनीच्या व्यवसायात चांगली वृद्धी दिसून आली होती.
कार देखोवर दर महिन्याला 50 दशलक्ष नेटकऱ्यांनी भेट दिली. त्यातून 9 दशलक्ष लिड्स मिळाल्या. वर्ष 2022 मध्ये कारदेखोने 16 लाख विमा पॉलिसींची विक्री केली. जवळपास 1 लाख वाहन कर्जे वितरित केली. कारदेखो ग्रुपमध्ये कारदेखो, बाइकदेखो, इन्शुरन्सदेखो, रुपे आणि झिगव्हिल्स या कंपन्यांचा समावेश आहे.
कारदेखोने वेगवेगळ्या व्यवसायात विस्तार केला आहे. ग्राहकांना प्रत्येक टप्प्यावर डिजिटल सेवा देऊन त्यांचा खरेदीचा अनुभव समृद्ध करण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे कारदेखोचे संस्थापक सीईओ अमित जैन यांनी सांगितले.आर्थिक वर्ष 2024 मध्ये नफ्यात येण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे मुख्य वित्तीय अधिकारी मयांक गुप्ता यांनी सांगितले.