बँकिंग रिक्रूटमेंट एजन्सी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शननंदेखील (IBPS) बँकिंग इच्छुकांच्या आवश्यक पात्रतेमध्ये चांगल्या सिबिल स्कोअरची अट जोडली आहे. ज्यांचा सिबिल स्कोअर 650पेक्षा कमी असेल त्यांना नोकरी मिळणार नाही, असं सांगण्यात आलं आहे. क्रेडिट स्कोअर नसल्यास बँकांकडून एनओसी आवश्यक असेल. एनओसी नसेल तर ऑफर लेटर रद्ददेखील केलं जाऊ शकतं.
काय सांगितलं आयबीपीएसनं?
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS), सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांसाठी (स्टेट बँक ऑफ इंडिया वगळता) सामायिक भर्ती करणारी संस्था आहे. याद्वारे जारी केलेल्या या वर्षीच्या पहिल्या मोठ्या लिपिक (Clerk) भरती अधिसूचनेमध्ये अर्जदारांसाठी नवीन क्रेडिट हिस्ट्री कलम आहे. अर्ज करणार्या उमेदवारांनी त्यांची क्रेडिट हिस्ट्री चांगली ठेवणं गरजेचं आहे. बँकांमध्ये सामील होताना त्यांचा किमान सिबिल स्कोअर 650 किंवा त्याहून जास्त असेल याची काळजी घ्यावी, असं आयबीपीएसनं अधिसूचनेत म्हटलं आहे.
...तर ऑफर लेटर रद्दही होऊ शकतं
ज्या उमेदवारांचा सिबिल स्टेटस सामील होण्याच्या तारखेपूर्वी अपडेट केलेला नाही, त्यांनी एकतर त्यांचं स्टेटस अपडेट करणं गरजेचं आहे. खात्यांबाबत कोणतीही थकबाकी नसल्याबद्दल बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) सादर करणं गरजेचं आहे. अन्यथा पात्रता निकषांनुसार ऑफर लेटर मागं घेतलं जाऊ शकतं किंवा रद्दही केलं जाऊ शकतं, असं म्हटलं आहे.
क्रेडिट स्कोर म्हणजे काय?
क्रेडिट स्कोअरिंगचं काम सिबिल किंवा एक्सपिरियनसारख्या (Experian) क्रेडिट ब्युरोला दिलं जातं. हे कर्जदारांचा क्रेडिट डेटा एकत्रित करण्याचं काम करतात. वैयक्तिक कर्जांवरच्या कर्जदाराचा क्रेडिट डेटा एकत्र करतात आणि त्यांना स्कोअर देतात. आजच्या काळात चांगला क्रेडिट स्कोअर 750च्या वर म्हणजे सर्वोत्तम मानला जातो. कर्जासाठी तो कामी येतो. चांगल्या स्कोअरशिवाय तुम्ही एकतर जास्त व्याजदर भरता किंवा कर्ज अजिबात मिळत नाही.