Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Canada Work Permit: कुटुंबीय किंवा पत्नीला कॅनडात सहज जाता येणार; 'ओपन वर्क परमिट' नियमावली काय आहे?

canada jobs

परदेशात शिक्षण किंवा नोकरीस जाण्यासाठी भारतीय उत्सुक असतात. कॅनडामध्येही मोठ्या प्रमाणात भारतीय स्थाईक झाले आहेत. अशा व्यक्तींचे कुटुंबीय किंवा पत्नी यांना कॅनडात जाण्याचा मार्ग आता सोपा झाला आहे. ओपन वर्क परमिट जलद मिळेल, अशी व्यवस्था कॅनडा सरकारने केली आहे.

Canada Work Permit: कॅनडात नोकरी, व्यवसायासाठी स्थाईक झालेल्या भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कॅनडा सरकारने अशा व्यक्तीचे कुटुंबीय किंवा पत्नीला सहज देशात येता येईल अशी व्यवस्था केली आहे. त्यास “ओपन वर्क परमिट” असे नाव देण्यात आले आहे. त्यानुसार जर एखादी व्यक्ती कॅनडात काम करत असेल तर त्याला पत्नी आणि कुटुंबियांना अगदी कमी कालावधीत व्हिसा मिळवता येईल.

कोरोनानंतर कॅनडामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे परदेशातील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी कर्मचारी धार्जिणे धोरण आखण्यात येत आहेत. अनेक भारतीय नागरिक कॅनडात स्थाईक झाले आहेत. तसेच शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कलही कॅनडाकडे आहे.

तात्पुरता रहिवासी व्हिसा (Faster temporary resident visa -TRV)

जोपर्यंत पत्नी किंवा कुटुबियांना कॅनडाचा कायम रहिवासी दर्जा मिळत नाही तोपर्यंत तात्पुरता रहिवासी व्हिसा तत्काळ देण्यात येईल. त्यामुळे कुटुंबियांची ताटातूट होणार नाही. इमिग्रेशन खात्याचे मंत्री Sean Fraser यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. कॅनडात काम करणाऱ्या भारतीय व्यक्तींना या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. 

स्थलांतराबाबत सरकारी पातळीवरील मोठे निर्णय

पत्नीचा अर्ज जलद विचारात घेण्यात येईल. तसेच तात्पुरता रहिवासी व्हिसा मिळेल.
पत्नीचे अर्ज निकाली काढण्यासाठी वेगळी सिस्टिम उभारण्यात येईल. 
फॅमिली क्लास या सुविधेखाली कुटुंबीय आणि पत्नीला ओपन वर्क परमिट मिळेल. 
ज्यांचे ओपन वर्क परमिट एक्सपायर व्हायला आले आहे त्यांना मुदतवाढ मिळणार

30 दिवसांच्या आत प्रक्रिया पार पडणार

फॅमिली क्लास अंतर्गत कॅनडात येण्यासाठीचे अर्ज 30 दिवसांच्या आत निकाली काढण्यात येतील. हे अर्ज लवकर निकाली काढण्यासाठी नवी सॉफ्टवेअर प्रणाली देखील सुरू करण्यात आली आहे. सध्या अप्रूवल रेट 93% आहे. पत्नी आणि कुटुंब प्रमुखावर अवलंबून असलेले मुलेही कॅनडात काम करू शकतात.

1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान ज्यांचे ओपन वर्क परमिट कालबाह्य होणार आहेत त्यांना आता 18 महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे. कायम रहिवासी अर्जदार, कायम रहिवासी व्यक्तीची पत्नी/पती, कायम रहिवासी व्यक्तीची मुले यांना ओपन वर्क परमिट दिले जाते. सर्वांना ही सुविधा उपलब्ध नाही. 2022 वर्षात कॅनडाने 2022 वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त वर्क परमिट दिले आहेत.