SIP Investment: गुंतवणुकीचे नवनवे पर्याय आता उपलब्ध आहेत. पूर्वी रिअल इस्टेट म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा किंवा फ्लॅट, बंगलो खरेदी असेच समजले जायचे. मात्र, आता रिअल इस्टेटमध्ये फ्रॅक्शनल इनव्हेस्टमेंटही करता येते. गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी म्युच्युअल फंड एसआयपी हा पर्याय अलीकडे चांगलाच प्रसिद्धीस आला आहे.
पारंपरिक मुदत ठेवी, बाँड्स आणि बचत खात्यातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळत नाही, असा समज नागरिकांमध्ये वाढत आहे. कारण, महागाईचा वेग दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे इक्विट फंडाच्या विविध SIP योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीतून निश्चित परतावा मिळतो का? ते या लेखात पाहूया.
स्मॉल, मीड आणि लार्ज कॅप कंपन्यांच्या इक्विटी, डेटसह विविध पर्यायांत म्युच्युअल फंड हाऊसद्वारे पैसे गुंतवले जातात. इक्विटी एसआयपी सर्वाधिक जोखमीच्या असतात. त्यातही स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांतील गुंतवणूक जास्त धोक्याची असते. प्रत्येक एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना रिस्क मीटर दिलेले असते. त्यामध्ये योजनेत किती जोखीम आहे हे दिलेले असते. कमी, मध्यम, अधिक, सर्वाधिक जोखीम अशा श्रेणी दिलेल्या असतात. त्यातून योजनेत किती जोखीम आहे हे समजते.
सर्वात जास्त जोखीम असणाऱ्या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर मुद्दलही गमावण्याची वेळ येऊ शकते. बाजारातील स्थितीनुसार रिटर्न्स बदलत असतात. एसआयपीद्वारे निश्चित परतावा मिळण्याची खात्री नसते. तसेच फंड हाऊस तुम्हाला तसे आश्वासनही देत नाही. मात्र, दीर्घकाळ गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते.
इक्विटी योजनांमधील गुंतवणूक विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये केली जाते. जर कंपनीचा नफा कमी झाला, कंपनी तोट्यात गेली, बाजारातील स्थितीमुळे शेअर्सचे मूल्य मोठ्या प्रमाणात खाली-वर होते. त्यामुळे म्युच्युअल फंड हाऊस अनेक कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करतात. एकाच वेळी सर्व कंपन्या तोट्यात जाण्याची शक्यता कमी असते.
मात्र, सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी कोणत्याही एसआयपी योजनेत गुंतवणूक करताना जोखीम किती आहे हे प्रथम पहावे. तसेच मागील पाच ते दहा वर्षातील रिटर्न्स किती आहेत ते पहावे. जोखीम जास्त असलेल्या योजनांसोबतच काही एसआयपी कमी जोखीम असलेल्या योजनांमध्येही गुंतवावेत. त्यामुळे जोखीम कमी राहील. तसेच तुमच्या गुंतवणुकीतही वैविध्य राहील.
एसआयपीचा फायदा म्हणजे तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. तसेच पाहिजे तेव्हा एसआयपी थांबवू किंवा तात्पुरती बंद करू शकता. आणीबाणीच्या काळात पैसे काढूनही घेऊ शकता. तसेच दीर्घकाळात चांगला परतावा मिळत असल्याने एसआयपीस पसंती मिळत आहे. मात्र, निश्चित परताव्याची गॅरंटी कोणीही देत नाही. त्यामुळे तुमचे उत्पन्न, खर्च, जबाबदाऱ्या पाहून जोखीम घ्या.