भारतात जमिनीची खरेदी-विक्री न करता आपल्या ओळखीतल्या कुणा व्यक्तीला किंवा नातेवाईकाला मालमत्ता देणे काही नवीन नाही. तसेच कोणत्या सामाजिक संस्थेला, मंदिर ट्रस्टला देखील इनामपत्र , बक्षिसपत्र म्हणून संपत्ती दिली जाते. परंतु एका बक्षिसपत्र म्हणून दिलेली संपत्ती परत घेता येते का? जर घ्यायची असेल तर त्याला संविधानिक प्रावधान काय आहे? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडणे साहजिक आहे. चला तर जाणून घेऊया याबाबत कायदा काय म्हणतो ते…
मालमत्तेचे बक्षिसपत्र खरे तर संपत्तीच्या मूळ मालकाला कधीही परत घेता येऊ शकते, मात्र सहज वाटले म्हणून, काहीही कारण नसताना ही संपत्ती, मालमत्ता परत घेतली जाऊ शकत नाही. त्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
बक्षिसपत्र म्हणून जेव्हा संपत्तीचे मूळ मालक आणि ज्याला संपत्ती द्यायची आहे अशी व्यक्ती यांच्यामध्ये एक लिखित करार केला जातो. या कराराद्वारे संपत्तीचे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे बक्षिसपत्र म्हणून हस्तांतरण होत असते. त्यामुळे करारात नमूद केलेल्या गोष्टींवर, अटींवर दोन्ही व्यक्तींची सहमती असणे आवश्यक आहे. कराराचा भंग केल्यास मूळ मालक झालेले बक्षिसपत्र रद्द करू शकतो आणि संपत्तीवर दावा ठोकू शकतो. चला तर जाणून घेऊयात, कुठल्या परिस्थितीत मूळ मालक बक्षिसपत्र रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
परस्पर संमती न झाल्यास
आधीच सांगितल्याप्रमाणे दोन्ही पार्टीमध्ये बक्षिसपत्र करण्यासाठी करार केला जातो. या करारात नमूद केलेल्या अटींचे उल्लंघन होत असल्यास बक्षिसपत्र रद्द करण्याचा अधिकार मूळ मालकाला असतो. यामुळे करारातील नियम व अटी आधीच बारकाईने तपासून घ्याव्यात.
फसवणूक किंवा बळजबरी झाल्यास
बक्षिसपत्र करणे हे अनेकदा जोखीमेचे काम असते. याचे कारण म्हणजे अनोळखी व्यक्तीला, संस्थेला जर देणगीदाराने संपत्ती दिली असेल आणि कालांतराने मूळ मालकाला असे वाटले की, ज्या उद्देशाने त्यांनी मालमत्ता बक्षिसपत्र म्हणून दिली होती, तो उद्देश साध्य होत नाहीये. अशावेळी मूळ मालक फसवणूक झाली म्हणून बक्षिसपत्र रद्द करू शकतो.
तसेच बळजबरीने कुणाकडून बक्षिसपत्र करून घेणे हा देखील कायद्याने गुन्हा आहे. न्यायालयात हे प्रकरण गेल्यास बळजबरीने बक्षिसपत्र करून घेणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाते आणि बक्षिसपत्र रद्द केले जाते.
याशिवाय बक्षिसपत्र बेकायदेशीर किंवा सरकारी धोरणाच्या विरुद्ध असल्याचे आढळल्यास न्यायालय ते रद्द करण्याचा आदेश देऊ शकते.
त्यामुळे कुठलेही बक्षिसपत्र करताना कायद्याचे पालन होईल आणि कुठलीही चूक आपल्या हातून घडू नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे. यासाठी कायदेशीर सल्ला घेऊनच निर्णय घ्यायला हवा.