केंद्रिय मंत्रिमंडळाने 2025-26 पर्यंत 2,539.61 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह 'ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट (BIND)' योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
भारत सरकारने दूरदर्शन (Doordarshan) आणि आकाशवाणी (प्रसार भारती- Prasar Bharti) यांना लागणाऱ्या पायाभूत सोईसुविधा आणि या दोन्हींचा विकास, आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे प्रसार भारतीला प्रसारण व्यवस्थापनात पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
देशाच्या सरकारी प्रसारण यंत्रणेला बळकट करून, नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूरदर्शन आणि आकाशवाणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असा हेतू असल्याचे मंत्री ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.