बझफीड या डिजिटल मीडिया कंपनीने नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून 15 टक्के नोकरकपात केली जाणार आहे. यामध्ये बिझनेस, काँटेन्ट, टेक्निकल आणि अॅडमिन विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. गुरूवारी सकाळी कंपनीच्या संस्थापक जोनाह पेरेट्टी यांनी कर्मचाऱ्यांना मेल पाठवून या संदर्भात माहिती दिली. यामुळे बझफीड माध्यमाच्या बातम्यांचा विभाग आता बंद होणार आहे.
या नोकरकपातीच्या कारणास्तव कंपनीच्या दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सुद्धा कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर शेअर बाजारात बझफीड कंपनीच्या शेअर्सच्या किंमती सुद्धा 16 टक्क्याने घसरल्या.
बझफीडने का केली नोकरकपात
बझफीडचे संस्थापक जोनाह पेरेट्टी यांनी आपल्या ईमेल मध्ये नोकरकपातीचे स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे. कोरोनाची साथ आणि त्यामुळे आलेली जागतिक मंदी या कारणास्तव जाहिरातींचा ओघ थांबला आहे. त्यामुळे कंपनीला आर्थिक फटका बसला आहे. या कारणास्तव नोकरकपातीचा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे, असं पेरेट्टी यांनी म्हटलं आहे. येत्या महिन्यात कंपनीतल्या 180 लोकांना कामावरून काढण्याचा कटू निर्णय कंपनीला घ्यावा लागला आहे. सध्या अमेरिकेतल्या या तरुणाईला आकर्षित करणाऱ्या कंपनीच्या ताफ्यात 1,600 लोक काम करत आहेत.
काय आहे बझफीड मीडिया कंपनी
बझफीड ही इंटरनेट मीडिया कंपनी आहे. या कंपनी अंतर्गत बातम्या व मनोरंजनासह डिजीटल मीडिया क्षेत्रात कार्यरत होती. जोनाही पेरेट्टी, जॉन सिवार्ड आणि जॉन्सन थ्री या तीन सह-संस्थापकांनी एकत्र येत 2006 साली ही कंपनी सुरू केली. या कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात आहे. 2021 साली स्पेशल पर्पझ एक्विझिशन कंपनी अंतर्गत ही कंपनी शेअर मार्केट मध्ये लिस्टेड झाली.या माध्यमातून चांगली गुंतवणूक मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, यामध्ये त्यांना यश मिळण्या ऐवजी कंपनीचं नुकसान झाल्याचं पेरेट्टी यांनी मान्य केलं आहे.
बझफीड या कंपनीने फक्त तरुण आणि जेनझी लोकांसाठी काँन्टेन्ट बनवण्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यामुळे त्यांचे कार्यक्रम, लेख आणि अगदी बातम्याही वैशिष्ट्यपूर्ण मानल्या गेल्या. आणि वेबसाईटला दिलेल्या नवीन ट्रिटमेंटमुळे या ब्रँडची चर्चाही होत राहिली. पण, अशा या कंपनीला आता नोकर कपात करावी लागत आहे.