तुम्ही कधीकाळी स्वतःची गाडी खरेदी करण्याचा विचार केला होता. पण गाड्यांच्या वाढत्या किमती, पेट्रोलचा खर्च, गाडीचा मेन्टेनेन्स या सगळ्यांचा विचार करून गाडी खरेदी न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिलात. असा विचार करणारे तुम्ही एकटेच नाही. तुमच्यासारखे अनेक जण आहेत. फक्त थोड्याफार फरकाने त्यांची कारणे वेगवेगळी असू शकतात. पण यामुळे तुम्ही नाराज होण्याचे काहीच कारण नाही. कारण यावर एक नामी उपाय आहे. तो म्हणजे, भाड्याने गाडी घेणे. तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही भाड्याने गाडी घेऊ शकता. विनाकारण गाडी खरेदी करून प्रदूषणाचा वाटेकरी कशाला व्हायचे! भाड्याच्या गाडीचे अनेक फायदे आहेत, जसे की, तिची दुरुस्ती, तिच्यावरील भलेमोठे कर्ज आणि इतर जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडाव्या लागत नाहीत.
आजकाल, भाड्याने गाडी देणाऱ्या कंपन्यांची संख्या ही वाढत आहे. त्यातून तुम्ही तुमच्या पसंतीची गाडी भाड्याने घेऊ शकता. पण वरील सर्व अडचणीतून मार्ग काढला तरी तुम्हाला गाडी चालवताना तुमची आणि भाड्याने घेतलेल्या गाडीची सुरक्षितता राखणे तितकेच जबाबदारीचे काम आहे. यासाठी तुम्हाला गाडीचा विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे. आणि भाड्याच्या गाडीवरसुद्धा विमा काढता येतो. भाड्याच्या गाडीचा विमा वैयक्तिक गाडीच्या विम्यापेक्षा थोडा वेगळा असतो. त्यातील काही घटक आपण समजून घेणार आहोत.
गाडीच्या बाहेरील नुकसानाचे कव्हरेज (Collision Damage Waiver)
कोलिशन डॅमेज वेव्हर ही अशी सुविधा आहे, ज्याद्वारे तुमच्या भाड्याने घेतलेल्या गाडीच्या नुकसानीचा विमा काढला जातो. यामध्ये गाडीचे बाहेरून झालेले नुकसान जसे की, स्क्रॅच, ठोकरमुळे झालेले नुकसान भरून दिले जाते. यात गाडीची बॅटरी, टायर, इंजिन, गिअरबॉक्स किंवा अगदी विंडशील्ड आणि गाडीच्या कोणत्या पार्टचे नुकसान कव्हर होत नाही. तसेच बेजबाबदारीने गाडी चालवण्यामुळे झालेले नुकसान ही कोलिशन डॅमेज वेव्हरमध्ये अंतर्भूत नाही.
गाडी चोरीपासून संरक्षण (Protection from theft)
गाडीच्या नुकसानीनंतर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडीच्या चोरीपासून संरक्षण मिळणे. तुम्ही जर भाड्याची गाडी वापरत असाल आणि त्या गाडीची चोरी झाल्यास त्याची जबाबदारी तुमची असते. अशावेळी चोरीपासून संरक्षण देणारा विमा उपयोगी ठरतो आणि तुमचे आर्थिक नुकसान होण्यापासून तुम्हाला सुरक्षितता मिळते.
इतर व्यक्तींचा किंवा वस्तूंचा विमा (Third-party liability)
वैयक्तिक वाहन विम्यातील पॉलिसीनुसार रेंटल कार इन्श्युरन्स पॉलिसीमध्येसुद्धा थर्ड पार्टी कार इन्शुरन्स कव्हर केला जातो. या विम्या अंतर्गत अपघातामुळे कोणत्याही व्यक्तीला इजा झाली किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याचा कव्हर यातून मिळतो.
भाड्याच्या गाडीसाठी विमा खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत ?
वैयक्तिक वाहनासाठी विमा पॉलिसी घेण्यापेक्षा भाड्याच्या गाडीसाठी विमा घेतानाचे नियम वेगळे असतात. अशाचा काही गोष्टी आपण समजून घेऊ.
कोलिशन डॅमेज वेव्हरची कमाल मर्यादा : तुमच्या पॉलिसीमध्ये कव्हर केलेल्या नुकसानाची कमाल रक्कम ही तुम्ही निवडलेल्या पॉलिसीवर अवलंबून असते. एखाद्यावेळेस, जर रेंटल कार कंपनीचा दावा तुमच्या पॉलिसी कव्हरेजपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला अधिकचे पैसे तुमच्या खिशातून भरावे लागतील.
वजावट : वजावट हा असा एक खर्च आहे जो एकूण रकमेतून वजा केला जाऊ शकतो. म्हणजेच त्याचे तुम्हाला आगाऊ पैसे घेतले जातात. अशावेळी सर्वसमावेशक कव्हरेज किंवा शून्य वजावट कव्हर असलेला विमा खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते. यामुळेत तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही.
रस्त्याच्या कडेला मिळणारी मदत: भाड्याच्या गाडीसाठी या सुविधेचे विमा कंपन्यांचे वेगवेगळे नियम आहेत. काही विमा कंपन्या किरकोळ रक्कम आकारून ही सुविधा देतात, तर काही कंपन्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्येच ही सुविधा देतात.
भाड्याच्या गाडीचा विमा खरेदी करताना संपूर्ण गाडी कोलिशन डॅमेज वेव्हर अंतर्गत कव्हार आहे की काही ठराविक गोष्टीच यात अंतर्भूत आहेत, याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा दाव्याच्या वेळी पैसे भरताना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे रेंटल कार इन्शुरन्स पॉलिसी निवडताना वर नमूद केलेल्या गोष्टींची पडताळणी करून घ्या. विमा खरेदी करताना आणि त्याचा प्रीमियम ठरवताना याची तुम्हाला मदत होऊ शकेल.