घर हा आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. स्वतःच हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्या मूलभूत गरजांपैकी एक असलेला निवारा हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. पण हा निवारा स्वतःचा विकत घ्यावा की भाड्याने घ्यावा, हा ज्याचा त्याचा विचार आहे.
महागाईच्या काळात घराच्या किमती आणि सर्वसामान्यांचा पगार याचा कुठे ताळमेळ बसत नाही. जर स्वतःचे घर घ्यायचे झाले तर त्या घराच्या किमतीच्या 20 ते 25 टक्के रक्कम आपल्या हातात असणे गरजेचे आहे. या रकमेसाठी सर्वसामान्य व्यक्ती आपली सर्व बचत खर्ची घालतो. तसेच उर्वरित रक्कम गृहकर्ज (Home loan) घेऊन उभी करू शकतो. पण हा कर्जाचा हप्ता आपले उत्पन्न इतर खर्च, भविष्यातील बचतीचा समतोल बिघडवतो. कारण पगारातील जास्तीत जास्त भाग हा हप्त्यांमध्ये जातो. घरासोबत खर्च ही आणखी वाढतो. घराचा देखभाल खर्च, मालमत्ता कर आणि इतर संबंधित खर्चही वाढतो. त्या तुलनेत जर का भाड्याने घर घेण्याचा विचार केला तर खर्च कमी होतो आणि आपल्याला हवे तसे घर कमी मोबदल्यात मिळते. नोकरीच्या निमिताने काहींना सतत शहर बदलावे लागते. अशा वेळी स्वतःचे घर असूनही भाड्याच्या घरात राहावे लागते. मग एकाचवेळी घराचे भाडे, स्वतःच्या घराचा हप्ता, देखभाल खर्च यामुळे सगळी खर्चाची गणितं बिघडतात.
नोकरी लागल्यानंतर लगेच घर घेण्याच्या मागे न लागता काही वर्षे भाड्याच्या घरात राहावे. भाड्याच्या घरात राहण्याचे अनेक फायदे आहेत. आपण आपल्या आवडीच्या ठिकाणी राहू शकतो. त्यासाठी देखभाल खर्च ही करावा लागत नाही. याच दरम्यान घरासाठी आपल्या उत्पनाचे 2 ते 3 भागात योग्य नियोजन करावे. आपल्याकडे स्वतःच्या घरासाठी लागणारी जास्तीत जास्त रक्कम आपल्या खात्यात जमा झाली कि मग घर घेण्याची तयारी करावी. असे केल्याने घरासाठी घ्यावं लागणारं कर्ज हे खूपच कमी असेल आणि त्याचा हप्ता ही कमी असेल. तसेच नियोजित बचतही होत राहील.
ज्यांचे उत्पन्न 6 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा कुटुंबाला इन्कम टॅक्सची चिंता करायची आवश्यकता नाही. गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय वापरून त्यांनी सर्वप्रथम स्वतःची बचत वाढवावी. यासाठी भाड्याच्या घरात अधिक काळ राहावे लागेल, पण त्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा योग्य प्रकारे पूर्ण होण्यास मदत होईल. कालांतराने त्यांच्याकडे पुरेसा पैसा आला की ते नवीन किंवा जुने घर विकत घेण्याचा निर्णय घेऊ शकतील. आणि ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, नियमित उत्पन्नाचे साधन असेल त्यांनी भाडे भरण्याऐवजी घरासाठी कर्ज काढून बॅंकेचे हफ्ते भरून स्वत:च्या मालकीचे घर बनवावे.