मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये घर घेणं अनेकांना परवडत नाही आणि त्यामुळे लोक भाड्याने राहाणं पसंत करतात. पण आपले देखील घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि घर घेण्यासाठी ते आयुष्यभर प्रयत्न करत असतात. काहींना तर अनेक वर्षं नोकरी केल्यानंतरही स्वत:चे घर घेणे शक्य होत नाही. आपले घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी काही गोष्टी करणे अत्यंत गरजेच्या आहेत. आजकाल बँका घर घेण्यासाठी घराच्या किमतीच्या 80 टक्के कर्ज देतात. त्यामुळे घराची केवळ 20 टक्के रक्कम आणि रजिस्ट्रेशनच्या पैशांची जुळवाजुळव करावी लागते. तुम्ही तुमच्या काही गरजा कमी केल्या आणि तुमच्या मिळकतीतील काही पैसे दर महिन्याला बाजूला काढून ठेवले तर घर घेणं तुम्हाला नक्कीच शक्य होईल.
घराचे बजेट
घर घेताना तुमचे बजेट किती आहे? याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रत्येक महिन्याला किती पैशांची बचत करावी लागेल, याचा अंदाज येऊ शकतो. एकदा घर घेतले की, ते किमान 15 ते 20 वर्षे विकण्याचा सहसा कोणी विचार करत नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करून घर घेणं गरजेचे आहे.
घराचे ठिकाण
घर चांगल्या परिसरात असेल तर भविष्यात त्याची चांगली किंमत मिळू शकते. तसेच घर बस स्थानक, रेल्वे स्थानक किंवा कोणत्या सार्वजनिक ट्रान्सपोर्टपासून जवळ असावे. त्यामुळे तुमचा प्रवासातील वेळ वाचू शकेल.
परिसरातील घरांचे भाडे
काहीजण गुंतवणूक म्हणून घर विकत घेतात. त्यामुळे ते त्या घरात राहायला न जाता ते भाड्याने देतात. तुम्ही घर भाड्यावर देण्याच्या विचारात असाल तर एखाद्या परिसरात किती भाडे मिळते याचा विचार करा. ज्या परिसरापासून स्टेशन, बाजार, शाळा, रुग्णालय जवळ असतात, त्या घरांना अधिक भाडे मिळते. त्यामुळे घर घेताना या गोष्टी लक्षात ठेवा.
पुनर्विक्रीची योग्य किंमत
कोणत्याही घरात गुंतवणूक करताना त्या घराची काही वर्षाने विक्री केली तर तुम्हाला किती किंमत मिळू शकते याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. घर निवडताना सर्व सुविधा जवळ आहेत का हे पहावे. त्यामुळे भविष्यात तुमच्या घराला योग्य किंमत मिळण्यास मदत होईल.
कर्जासाठी पात्रता तपासून घ्या
घर विकत घेताना तुम्हाला किती कर्ज मिळू शकते याचा विचार करावा. तसेच कर्ज कसे परत करू शकता यावर तुमची पात्रता ठरते. तुमचे उत्पन्न, वय, तुमच्यावर असलेली इतर दायित्वे यावर तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची किंमत ठरते.
स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी
कोणत्याही नवीन घरासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरावी लागते. त्यामुळे तुमच्या शहरात स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी चे दर काय आहेत, हे जाणून घेतल्यास ऐनवेळी पैशांची अडचण येत नाही.
घराचा विमा
घराचा विमा काढणे हा गरजेचा असतो. भविष्यात घराला कोणत्याही प्रकारची हानी झाली तर तुम्हाला आर्थिक संरक्षण मिळते. घराच्या किंमतीच्या तुलनेत विम्याचा हफ्ता हा खूपच कमी असतो आणि या रकमेत तुम्हाला संपूर्ण संरक्षण मिळते.