Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी...

गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी...

गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी काही बाबी पडताळून पाहणे गरजेचे आहे.

साधारणपणे घर, फ्लॅट, भूखंडावर घर बांधकाम किंवा रिनोव्हेशन करण्यासाठी गृहकर्ज घेतले जाते. अनेकदा घराची डागडुजी करण्यासाठी किंवा मजला चढवण्यासाठी देखील गृहकर्जाला प्राधान्य दिले जाते. मात्र सर्वांनाच तातडीने कर्ज मिळतेच असे नाही. कारण क्रेडिट स्कोरमधील त्रुटी आणि अन्य कारणांमुळे कर्ज नाकारले जाते किंवा त्याचे प्रमाण कमी राहू शकते. अशा स्थितीत बँकेत चकरा मारण्यापेक्षा आपण किती कर्ज मिळवू शकतो किंवा मिळते की नाही याचे आकलन करणे गरजेचे आहे.

घरासाठी आपल्याला कर्ज मिळते की नाही हे तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. गृहकर्ज मंजूर झाले तर किती मिळू शकते, याबाबत उत्सुकता असते. विशेषत: पहिल्यांदा कर्ज घेणार्‍या मंडळींना ही बाब मोलाची वाटते. पूर्वीच्या तुलनेत गृहकर्जाबाबत बँकांकडून अधिक सुविधा दिल्या जात आहेत. सध्या व्याजदर कमी असल्याने आणि प्राप्तीकरात सवलत मिळत असल्याने घर घेताना अनेकांचा कल गृहकर्जाकडे राहतो. 

गृहकर्ज घेण्याचे कारण

प्रथमच घर खरेदी करणार्‍या लोकांना कर्जाची गरज भासते. त्याचवेळी दुसर्‍यांदा घर खरेदी करताना गृहकर्ज घेणार्‍या लोकांसाठी बँकांचे धोरण मात्र वेगळे राहू शकते. त्यामुळे आपण कोणत्या कारणासाठी कर्ज घेत आहात, हे लक्षात घेतले पाहिजे.

किती कर्ज घेऊ शकतो? 

गृहकर्जासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आपले उत्पन्न जाणून घ्या. कारण आपल्या उत्पन्नानुसार बँक कर्ज देत असते. तसेच गृहकर्जाची रक्कम ही त्याची परतफेड करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. आपले मासिक उत्पन्न, खर्च, नातेवाईकांचे उत्पन्न, मालमत्ता, कर्ज, उत्पन्नातील स्थिरता यासारख्या गोष्टींवर कर्जाची रक्कम अवलंबून असते. आपण वेळेत कर्ज फेडू शकता की नाही याचे आकलन बँक करत असते.

उत्पन्नाच्या प्रमाणात कर्ज

दरमहा आपल्या हातात येणारी रक्कम जसजशी वाढत जाते, तसतसे गृहकर्जाची रक्कम वाढत जाते. साधारणपणे, कोणतीही बँक आपल्या उत्पन्नाच्या 50 टक्के कर्ज देण्याची तयारी करत असते. गृहकर्जाचा कालावधी आणि व्याजदर हा कर्जाच्या रक्कमेवर अवलंबून असतो. याशिवाय बँकाकडून अर्जदाराचे वय देखील पाहिले जाते.

गृहकर्ज किती अधिक मिळू शकते? 

कोणतेही घर आणि फ्लॅट असो त्याच्या एकूण किंमतीच्या दहा ते वीस टक्क्यांपर्यंत आपल्याला डाऊनपेमेंट द्यावे लागते. त्यानंतर मालमत्तेच्या 80 ते 90 टक्कयांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्यात रजिस्ट्रेशन, ट्रान्सफर आणि स्टँप ड्यूटी यासारख्या शुल्काचाही समावेश करावा लागतो. मालमत्ता खरेदी करताना अधिकाधिक डाऊनपेमंट करणे गरजेचे आहे. यानुसार कर्जाचा बोजा कमी राहू शकतो. गृहकर्ज देणार्‍या बँका या दिर्घकाळात आपल्याकडून अधिक व्याज वसूल करतात, हे लक्षात घ्यायला हवे. संयुक्तपणे कर्ज घेतल्यास कर्जाची रक्कम अधिक राहते आणि जामीनदाराचीही गरज भासत नाही. यात नवरा-बायको, मुलगा-वडिल, आई-वडिल अशा रितीने संयुक्त कर्जासाठी अर्ज करता येतो. दोघेही नोकरदार असतील तर कर्ज मिळण्यातील अडचणी तुलनेने कमी राहतात.

कोणती कागदपत्रे हवीत?

गृहकर्जासाठी अर्ज करताना डॉक्यूमेंटची चेकलिस्ट असते. कायदेशीर कागदपत्रांपासून आयडेंटी आणि रेसिडेन्सी पुरावे, सॅलरी स्लिप आणि फॉर्म 16 ची प्रत गरजेची असते. प्राप्तीकर विवरणपत्राबरोबरच गेल्या सहा महिन्याचे स्टेटमेंट द्यावे लागते. याशिवाय काही बँकाची जीवन विमा पॉलिसी, शेअरबाजाराचे कागदपत्रे, एनएससी, म्युच्युअल फंड, बँक डिपॉझिट आदी कागदपत्रांची बँकाकडून मागणी होऊ शकते. याशिवाय आपल्या नावावर किंवा जोडीदाराच्या नावावर मालमत्ता असल्यास बँका कर्जफेडीबाबत निश्चिंत राहतात.