घर घेणं हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सध्या सगळीकडे कॉम्पलेक्स उभारले जात आहेत. त्यामुळे एखाद्या आलिशान कॉम्पलेक्समध्ये आपले देखील घर असावे असे प्रत्येकाला वाटते. पती-पत्नी दोघेही नोकरी करत असल्याने घर घेणं हे अधिक सोपं झाले आहे. पण घर घेताना नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये घ्यावे की रिसेलमध्ये घ्यावे असा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो. याविषयी तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही या लेखाद्वारे प्रयत्न करत आहोत.
नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घर घेणे म्हणजे हे घर बिल्डरकडून घेतले जाते. तर जुने घर म्हणजेच रिसेल घर हे घर मालकाकडून घेतले जाते. हा या दोन्ही प्रकारच्या घरातील सगळ्यात मोठा फरक आहे. त्यामुळे घर घेताना तुमचे राहणीमान कशा पद्धतीचे आहे? तुमचे घराचे बजेट किती आहे? या घटकांवर घर नवीन बांधकामात घ्यायचे की जुने घ्यायचे हे अवलंबून असते. काही जणांना त्यांच्या मर्जीप्रमाणे घराचे इंटेरिअर करून घ्यायचे असते. ते नवीन बांधकामातील घराला पसंती देतात. कारण नवीन बांधकामात घर विकत घेतल्याने तिथे कोणत्या गोष्टी हव्यात किंवा नकोत हे बिल्डरला सांगता येते आणि त्यामुळे घर घेतल्यानंतर घरात कोणतेही बदल करावे लागत नाहीत.
पण एखादे जुने घर घेऊन त्याचे इंटेरिअर तुमच्या पद्धतीने करण्याचा विचार केला तर त्यासाठी अधिकचा खर्च करावा लागतो. कारण जुन्या घरात बदल करण्याचा खर्च हा खूपच जास्त असतो. पण काही वेळा तुम्हाला एखाद्या परिसरातच घर घ्यायचे असे तुम्ही ठरवले असेल आणि त्या परिसरात नवीन कोणतेही बांधकाम सुरू नसेल तर जुने घर घेण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी जुने घर घेऊन पाहिजे तसे बदल करून घेतले जातात. तसेच शहरातील मुख्य परिसरात अनेकवेळा नवीन बांधकाम सुरू असलेली घरे खूपच महाग असतात. अशावेळी जुने घर घेऊन त्यावर आपल्या इच्छेनुसार खर्च करणे काही लोकांना परवडते.
तुम्ही एखाद्या ठराविक परिसरात नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये घर घ्यायला गेलात तर ते अधिक महाग पडते. त्याच तुलनेत तुम्हाला जुने घर कमी किमतीत मिळू शकते. त्यामुळे जुने घर घेण्याकडे लोकांचा कल अधिक असतो. पण नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये घर घेण्याचे खूप फायदे आहेत. याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
परवडणारी घरे
नवीन बांधकामातील घरे ही जुन्या घरांपेक्षा अधिक महाग असतात, असे अनेकांना वाटते. त्यामुळे अधिकाधिक लोक जुनी घरे घेतात. पण यात तथ्य नाही. कारण जुन्या घरांना स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, ट्रान्सफर फी यांसारखे अधिकचे शुल्क द्यावे लागते. तसेच जुन्या घरात आधीचे लोक अनेक वर्षं राहिलेले असतात. त्यामुळे त्या घरातील सगळ्याच गोष्टी या जुन्या झालेल्या असतात. त्यामुळे घराला रंग देणे, घराची डागडुजी करणे, नळाचे पाईप गळत असल्यास ते बदलणे यांसारखे अनेक छोटे-मोठे खर्च करावे लागतात. घर विकत घेताना या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. पण घर घेतल्यानंतर आपल्याला हे सगळे खर्च करावे लागतात. त्यामुळे कधीकधी आपल्याला त्या किमतीत नवीन इमारतीत घर मिळाले असते असा पश्चाताप घर घेतल्यानंतर होतो.
विजेची बचत करणाऱ्या सुविधा
नवीन बांधकामात अद्यावत आणि भविष्याचा विचार करता आर्थिक बचत करणाऱ्या सोयीसुविधा दिल्या जातात. घराचे बांधकाम करताना विजेची बचत करणाऱ्या उपकरणांचा वापर अनेक बिल्डर करतात. अनेक इमारतींना सौर यंत्रणा लावली जाते. त्यामुळे विजेची मोठ्या प्रमाणावर बचत होते. एकदा इमारत बांधल्यानंतर तुम्ही अशा सुविधा त्यात सहजपणे समाविष्ट करू शकत नाही. त्यामुळे जुन्या घरांपेक्षा नवीन घराला अधिक पसंती दिली जाते.
मर्जीप्रमाणे गोष्टी करू शकता
घर बांधताना तुम्हाला तुमच्या घरात कोणत्या गोष्टी कशाप्रकारे हव्यात याविषयी तुम्ही बिल्डरला सांगू शकता. सध्या अनेक नवीन कॉम्प्लेक्समध्ये प्रत्येक खोलीला बाल्कनी दिली जाते. तुम्हाला बाल्कनी हवी नसल्यास किंवा ती छोटी हवी असेल तर तुम्ही बांधकाम सुरू असतानाच बदल करून घेऊ शकता. जुन्या घरात हा पर्याय नसतो. त्यामुळे अनेक ठिकाणी तडजोड करावी लागते. तसेच नवीन घरातील वायरिंगचे फिटिंग, नळाचे फिटिंग हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लावलेले असते. त्यामुळे घरात राहायला गेल्यानंतर त्यावर नव्याने खर्च करावा लागत नाही.
घर घेण्याची प्रक्रिया
जुने घर घेतानाची प्रक्रिया ही थोडी किचकट असते. ज्याच्याकडून घर घेतले जाणार आहे, त्याची माहिती काढणे, घराची सगळी कागदपत्रे तपासणे, घरावर लोन आहे की नाही, ते गहाण तर ठेवले नाही ना, अशा अनेक गोष्टी पाहाव्य लागतात. घराच्या नोंदणीविषयीची ही सर्व माहिती घ्यावी लागते. यात पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होतो. पण नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घर घेताना सर्व कागदपत्रे बिल्डरकडून तपासलेली असतात. तसेच रजिस्ट्रेशन प्रक्रिया देखील त्यांच्याकडूनच केली जाते. त्यामुळे या सगळ्यात तुम्हाला कोणताही त्रास घ्यावा लागत नाही.
पुनर्विक्रीची किंमत
एकदा आपण घर घेतले की, त्या घरात आपण अनेक वर्षं राहाणार असतो. त्यामुळे त्या घराची पुनर्विक्रीची किंमत (रिसेल व्हॅल्यू) काय असेल याचा लोक विचारच करत नाहीत. पण घर घेताना या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. कारण तुम्हाला दुसऱ्या शहरात राहायला जायचे असल्यास किंवा मोठ्या घरात शिफ्ट व्हायचे असल्यास किंवा इतर काही कारणांमुळे तुम्हाला हे घर विकावे लागले तर, अशावेळी घराची रिसेल व्हॅल्यू काढावी लागते. सहसा जुने घर विकताना त्याला तितकीशी किंमत मिळत नाही.
त्यामुळे घर घेताना पुरेसा विचार करणे गरजेचे आहे. नवीन बांधकामातले घ्यायचे की जुने घ्यायचे हे सर्वस्वी प्रत्येकाच्या बजेटनुसार, आवडीनिवडीनुसार आणि सोयीनुसार ठरते. त्यामुळे घर कोणतेही घ्या. पण ते घेताना वरील मुदद्यांचा नक्की विचार करा. त्यातून तुम्हाला तुमच्या पसंतीचे घर मिळण्यास नक्कीच मदत होईल.