Health Insurance Terms And Conditions: आजारपण, अपघात किंवा अचानक बिघडलेल्या वैद्यकीय परिस्थितीमुळे तुमच्यावर पडणारा अतिरिक्त मानसिक आणि आर्थिक ताण कमी करण्याचे काम आरोग्य विमा (Health Insurance) करीत असतो. त्यामुळे आरोग्य विमा पॉलिसीत उपचार, प्रिस्किप्शन, औषधे आणि इतर सेवा तसेच नियमित केल्या जाणाऱ्या आरोग्य चाचण्या या सर्व बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे.
आरोग्य विमा संरक्षण म्हणजे केवळ तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण नव्हे. तर हा विमा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी देखील जोडलेला असतो. कारण, जेव्हा तुमच्याकडे आरोग्य विमा असतो. तेव्हा तुम्हाला उपचार घेण्यास तात्काळ जवळ पैसे नसले की, आपले कसे होणार? हे टेन्शन राहत नाही. तुमच्याकडे आरोग्य विमा असतो, तेव्हा तुम्हाला योग्य उपचार वेळेवर मिळण्याची शाश्वती असते. म्हणून आरोग्य विमा ही एक महत्त्वाची गुंतवणूक आहे. तेव्हा आरोग्य विमा खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
Table of contents [Show]
कव्हरेज आणि फायदे
आरोग्य विमा खरेदी करताना सर्वप्रथम पॉलिसीधारकाला कोणते कव्हरेज आणि फायदे उपलब्ध आहेत, ते पाहणे महत्त्वाचे आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पॉलिसी नीट वाचून घ्या. ज्या आरोग्य विम्यामध्ये उपचारांचा प्रकार, हॉस्पिटलायझेशन पॅरामीटर्स आणि कव्हरेज समाविष्ट असलेल्या औषधांबद्दल माहिती आहे, तिच पॉलिसी घेण्याचा विचार करा.
कोणकोणत्या हॉस्पिटलचा समावेश आहे?
कॅशलेस उपचार सुलभ करता यावेत, यासाठी आरोग्य विमा कंपनी रुग्णालये आणि इतर आरोग्य सेवा देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांशी करार करतात. तेव्हा तुम्ही घेत असलेल्या इन्शुरन्स कंपनीच्या यादीत तुम्हाला हव्या असलेल्या डॉक्टरांची नावे आहेत का? हे एकदा तपासून घ्या.
प्रीमियम आणि खर्च
आरोग्य विमा पॉलिसी घेताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आरोग्य विमा पॉलिसीची किंमत होय. यामध्ये प्रीमियम, मासिक प्रीमियम, विमा घेतांना द्यावयाचे पैसे या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. विमा घेताना त्यामध्ये तुम्हाला नियमित केल्या जाणाऱ्या आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाय येजनांसाठी काही सवलत, ऑफर दिल्या जाते का? याचा देखील विचार करा.
नीट तपासणी करा
कोणत्याही इन्शुरन्सची निवड करताना त्या कंपनीला किती ग्राहकांनी पसंती दर्शविली आहे? कंपनीची प्रतिष्ठा काय आहे? कंपनीचा क्लेम सेटल रेशो किती आहे. तसेच ती कंपनी ग्राहकांच्या समस्यांचे कशाप्रकारे समाधान करते. या सगळ्या गोष्टींची पडताळणी करणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून शोधू शकता. तसेच तुमच्या मित्रमंडळी किंवा परिचयातील कुणी जर का त्या कंपनीची पॉलिसी घेतली असेल, तर तुम्ही त्यांनाही विचारु शकता.
दिलेल्या अटी काळजीपूर्वक वाचा
आरोग्य विमा पॉलिसी घेताना दिलेल्या अटी नीट वाचा. त्यामध्ये दिलेली वयोमर्यादा, आधीपासूनच असलेले रोग, वयोमर्यादा, विशिष्ट उपचार आणि कोणकोणत्या प्रक्रियांमधून जावे लागते, या सगळ्या गोष्टी निट पडताळून पाहा. तसेच, कोणकोणत्या आजारांच्या कव्हरेजसाठी किती प्रतिक्षा कालावधी दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी विचारपूर्वक वाचून मगच पॉलिसी खरेदी करण्याचा निर्णय घ्या.