Bachat Gat Success Story: नांदेडचे कुंटूर हे एक बाजारपेठेचे गाव आहे. या गावात इतर समाजा प्रमाणे धनगर समाजाचे लोकही राहतात. येथे जवळपास 120 धनगर कुटुंबाजवळ मेंढ्या आहेत. यापैकी 100 कुटुंब मेंढी पाळणे, लोकर विक्री करणे, मेंढ्यांची आणि लोकरीची विक्री करण्याचे कार्य करतात. या 120 कुटुंबाकडे जवळपास 4 हजार मेंढ्या आहेत. मेंढ्यांपासून मिळणाऱ्या लोकरीपासून महिला पारंपारिक पध्दतीने घोंगडी बनविण्याचे कार्य करतात.
Table of contents [Show]
ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने दिली गती
2010 मध्ये महालक्ष्मी स्वयंसहायत्ता महिला समूह या बचत गटाची स्थापना करण्यात आली. 11 महिलांनी मिळून हा बचत गट तयार करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत गावातील (GRP) रेखा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 2019 मध्ये अकरा महिलांचा 'महालक्ष्मी स्वयंसहायत्ता महिला समूहाची' नोंदणी करण्यात आली. या समूहाचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये खाते उघडण्यात आले. तसेच महिलांना उमेद अंतर्गत व्यवसायासंबंधित मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांचा आत्मविश्वास वाढला
गावात मेंढी पालनाचा व्यवसाय असला तरीदेखील धनगरांना लोकरीचे महत्व कळले नव्हते. उमेदच्या वतीने धनगरांना त्याचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच काही घोंगड्यांसह इतर काही लोकरी वस्तूंची विक्री एका प्रदर्शन दरम्यान करण्यात आली. या प्रदर्शनीमध्ये लोकरी वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळाल्याने महिलांचा आत्मविश्वास वाढला.
कर्ज आणि परतफेडीचे चक्र
आपला व्यवसाय पूढे वाढवायला हवा, या हेतूने 2020 मध्ये महिलांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून 50 हजार रुपयांच कर्ज घेतलं. त्यानंतर 1 लाखाचं, मग परत दोन लाख रुपयांचं कर्ज घेऊन त्यांनी आपला व्यवसाय आणखी मोठा केला. आता या महिला घोंगडीसह, आसनपट्ट्या, स्वेटर, मफलर, जॅकेट, टॉवेलपट्टी तयार करुन विक्री करतात. तसेच आतापर्यंत पारंपारिक पद्धतीने लोकरी विणणाऱ्या महिलांनी आपल्या कामाची गती वाढविण्याकरीता मशीन घेण्यास 4 लाख रुपये कर्जासाठी अर्ज केला आहे.
महिन्याला लाखोंचा नफा
या महिलांना 1 घोंगडी तयार करण्यास 4 दिवस लागतात. या घोंगड्या तीन प्रकारच्या असतात. त्यामध्ये पांढरी घोंगडी 3 हजार रुपये, काळी घोंगडी 2 हजार रुपये आणि करड्या रंगाची घोंगडी दीड हजार रुपयांना विक्री केल्या जाते. महालक्ष्मी स्वयंसहायत्ता महिला समूहाच्या महिला आता उमेद संस्थेच्या वतीने राज्यभर प्रदर्शन लावतात. या माध्यमातून या महिलांना महिन्याला लाखो रुपयांचा नफा होतो. हा नफा या 11 महिला समांतर वाटून घेतात.