Burger King: फास्ट फूड चेन बर्गर किंगने देखील त्यांच्या बर्गर आणि रॅपमध्ये टोमॅटोचा वापर करणे थांबवले आहे. सततच्या होणाऱ्या महागाईचा परिणाम फक्त सामान्यांवरच होत नाहीतर मोठ्या कंपन्यांवर देखील होत असल्याचा पाहायला मिळत आहे. तसेच, कंपनीने टोमॅटोला गुणवत्तेच कारण देत वगळले असल्याची माहिती त्यांच्या पोस्टद्वारे दिली आहे. याआधी प्रसिद्ध McDonald's आणि Subway ने त्यांच्या फूडमधून टोमॅटोला वगळले आहे. त्यामुळे आता बर्गर किंगही या यादीत सामील झाला आहे.
टोमॅटोलाही सुट्टी
सध्या सर्वच स्तरातून महागाई दिसून येत आहे, त्यात खाद्यान्नांच्या वाढत्या किंमतीमुळे भारतातील महागाई दराने जुलैमध्ये 15 महिन्यांची उच्चांकी गाठली असून 7.4 टक्क्यांवर पोहचला आहे. टोमॅटोने यात महत्वाचा वाटा उचलला आहे. तसेच, बर्गर किंगने त्यांच्या आउलेटच्या बाहेर एक नोटिस लावली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, टोमॅटोलाही सुट्टी गरजेची आहे, आम्ही आमच्या खाद्यान्नात टोमॅटो वापरण्यास असमर्थ आहोत. अशी विनोदी नोटिस कंपनीने लावली आहे.
महागाईचा परिणाम चोहीकडे
खाद्यान्नांच्या वाढत्या महागाईचा परिणाम केवळ टोमॅटोपुरता मर्यादित नाही. कारण, Subway ने काही दिवसांपूर्वीच त्याच्या सब्ससह वर्षानुवर्षे ऑफर केले जाणारे मोफत चीज स्लाईस बंद केले. त्याजागी कंपनी आता कॉस्ट कटिंग मूव्हमध्ये चीज सॉस देत आहे. त्यामुळे महागाईची झळ फूड उद्योगाला सहन करावी लागत आहे. तसेच, डोमिनोजने देखील आर्थिक आव्हानांना तोंड द्याव्या लागणाऱ्या ग्राहकांना दिलासा म्हणून एक पिझ्झा 49 रुपयांना विकणे सुरू केले आहे.
टोमॅटोची आवक घटली
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मान्सूनच्या पावसामुळे पिकांच्या उत्पादनावर आणि सप्लाय चेनवर परिणाम झाल्याने टोमॅटोच्या कमतरतेचे संकट 450 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. जरी वाढ कमी झाली असली तरी उद्योग अजून त्यातून सावरले नाहीत. त्यामुळे पूर्वस्थितीत यायला अजून त्यांना वेळ लागणार आहे. तसेच, काही ग्राहकांनी बर्गर किंगच्या पेजवर, माझ्या बर्गरमध्ये टोमॅटो का नाहीत? असा सवाल उपस्थित केला आहे. त्याला उत्तर देताना बर्गर किंगने म्हटले आहे की, भारतीय फ्रँचायझी गुणवत्तेचे खूप उच्च स्टॅंडर्ड पाळते. तसेच, काहीच दिवसांत टोमॅटो परत येणार असल्याचे वचनही बर्गर किंगने दिले आहे.