केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वाच्या काही घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्राशी संबंधित अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. भारताच्या पर्यटन क्षेत्राबद्दल बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की, सरकार पर्यटनाबाबत मिशन मोडमध्ये काम करणार आहे. पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात विशेषतः तरुणांसाठी नोकऱ्या आणि उद्योजकतेच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असे अर्थमंत्री म्हणाल्या. पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने देशभरातील 50 स्थळांची निवड केल्याचे देखील त्यांनी जाहीर केले. या निवडक ठिकाणांना सरकारी मदत दिली जाणार आहे. याशिवाय ‘स्वदेश दर्शन योजना’ आणि ‘देखो अपना भारत’ योजनेचाही उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला. सीमाभाग आणि ग्रामीण पर्यटनासाठी ‘स्वदेश दर्शन योजना’ उभारण्याची योजना असल्याचे सीतारामन म्हणाल्या.
पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि स्वदेश दर्शन योजना आणि देखो अपना भारत योजनेबद्दल 2023 च्या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा करण्यात आल्या आहेत ते जाणून घेऊया.
Table of contents [Show]
पर्यटन क्षेत्राबाबत अर्थमंत्र्यांची घोषणा
- देशभरातील 50 पर्यटन स्थळे सरकार विकसित करणार आहे. येत्या काळात या पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे.
- ही निवडलेली पर्यटन स्थळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी संपूर्ण पॅकेज (Complete Package) म्हणून विकसित केली जातील.
- स्वदेश दर्शन योजनेंतर्गत देशात पर्यटनाला चालना मिळणार आहे.
- प्रत्येक राज्यांच्या राजधानीत युनिटी मॉल (Unity Mall) उभारले जाणार आहेत.
- या युनिटी मॉल्स अंतर्गत एक जिल्हा, एक उत्पादन (One District One Product) आणि हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.
- याद्वारे पर्यटन क्षेत्रात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
स्वदेश दर्शन योजना काय आहे?
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत पर्यटन विकासासाठी कोट्यवधींचे प्रकल्प आणले जाणार आहेत. या योजनेद्वारे भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांवर वाहतूक,अर्थ, रोजगार आणि अन्न यासारख्या अत्यावश्यक गोष्टींवर लक्ष दिले जाईल. स्वदेश दर्शन योजनेंतर्गत पर्यटन क्षमता असलेल्या ठिकाणांचा नियोजनबद्ध पद्धतीने आणि प्राधान्याने विकास करण्यात येणार आहे. यासोबतच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि त्या भागात रोजगार निर्मितीची सरकारची योजना असेल.
स्वदेश दर्शन योजनेची वैशिष्ट्ये
या योजनेत गंगा नदीच्या काठावर वसलेल्या सर्व पर्यटन स्थळांमध्ये आवश्यकतेनुसार छोटी अतिथीगृहे, लहान तंबू, उद्याने इत्यादी बांधण्यात येणार आहेत. पर्यटकांना विदेशात जशा सुविधा मिळतात त्याच पद्धतीच्या सुविधा स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत देण्याचा सरकारचा मानस आहे. योजनेंतर्गत निवडलेल्या शहरांतील पर्यटन स्थळांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
कोणत्या पर्यटन स्थळांचा प्रचार केला जाईल?
सध्या स्वदेश दर्शन योजनेत बौद्ध तीर्थक्षेत्रे, 5 राज्यांतील 12 स्थळांवरील कृष्ण तीर्थक्षेत्रे, रामायण सर्किट म्हणजेच भगवान रामाशी संबंधित पर्यटन स्थळे, प्राचीन सुफी परंपरेशी निगडीत तीर्थक्षेत्रे, जैन तीर्थक्षेत्रे यांचा समावेश आहे.यात देशातील एकूण सात राज्यांचा समावेश असलेली अध्यात्मिक स्थळे आहेत जी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित केली जाणार आहेत. याशिवाय नॉर्थ ईस्ट सर्किट, इको सर्किट, ट्रायबल सर्किट, हेरिटेज सर्किट, वाइल्ड लाइफ सर्किट या संभाव्य पर्यटन स्थळांना चांगल्या सुविधा देऊन पर्यटनाला चालना दिली जाणार आहे.