Budget 2023 Updates: तुम्ही परदेशात प्रवासासाठी टूर पॅकेज शोधत असाल, तर यंदाचे बजेट तुमच्यासाठी निराशाजनक ठरू शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात परदेश प्रवास आणि भारतातून पैसे पाठवण्यासाठी टूर पॅकेजवर TCS दर 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आणला आहे.यामुळे भारताबाहेर प्रवास करणे आता महाग होणार आहे.
बुधवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाद्वारे प्रस्तावित वित्त विधेयक 2023-24 द्वारे, परदेशी प्रवास कार्यक्रमांवर 'टॅक्स कलेक्शन ऍक्ट सोर्स' (TCS) लादून प्राप्तिकर कायद्याच्या कलम 206C मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या उदारीकृत रेमिटन्स योजनेअंतर्गत, भारताबाहेर सात लाख रुपये पाठवण्यावर 20 टक्के TCS आकारला जाणार. या सुधारणा 1 जुलै 2023 पासून लागू होणार आहेत. अर्थमंत्र्यांनी यंदाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘स्वदेश दर्शन’ योजना देखील जाहीर केली. देशभरातील 50 पर्यटन स्थळांची निवड करून ही स्थळे जागतिक पातळीवर पर्यटकांना आकर्षित करतील अशा पद्धतीने विकसित करण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे देशांतर्गत पर्यटन व्यवसायला फायदा होईल आणि रोजगारनिर्मिती होईल अशी सरकारला अपेक्षा आहे. देशांतर्गत पर्यटनाला चालना देतानाचा परदेशी पर्यटन मात्र महागले आहे. परदेशात सुट्टी घालवण्याचा विचार जर करत असाल तर तुमचे बजेट तुम्हांला पुन्हा तपासून बघावे लागणार आहे.
Entrepreneurship And Sector-Based Skills To Be Boosted Under ‘Dekho Apna Bharat Scheme’
— Business Today (@business_today) February 1, 2023
Watch: https://t.co/o1t55C6YaB | @radicokhaitan @DailyhuntApp #AmritKaalBudget #Modinomics #BudgetWithBT #Budget2023 pic.twitter.com/qmUh1hKLEn
पुण्यातील पी स्वेयर ट्रीपचे संचालक प्रगत पडघन महामनीशी बोलताना म्हणाले की, सरकारचा हा निर्णय खरे तर पर्यटन व्यावसायिक आणि ग्राहक दोघांनाही न परवडणारा आहे. देशात पर्यटन तिकीटे बुक करण्यासाठी मोजक्याच सरकारी एजन्सी आहेत. खाजगी व्यावसायिक अजूनही संघटीत नाहीत, त्यामुळे व्यावसायिक आणि ग्राहक दोघांचेही नुकसान होणार आहे. परदेशी पर्यटनाला जाणाऱ्या लोकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मध्यमवर्गीय लोकांची संख्या वाढली आहे, सदर निर्णयामुळे मध्यमवर्गीय पर्यटकांची संख्या कमी होऊ शकते. सरकारने TCS कराबद्दल पुनर्विचार करायला हवा.
सध्या TCS किती आहे?
नांगिया अँडरसन या कंपनीचे सल्लागार अमित अग्रवाल माध्यमांशी बोलताना म्हणाले की, भारताची परकीय चलनाच्या साठ्याची सोयीस्कर स्थिती पाहता टीसीएसमध्ये पाच टक्क्यांवरून थेट 20 टक्क्यांपर्यंत वाढ होणे आश्चर्यकारक आहे. ते म्हणाले की अशा प्रकारे सरकारला परदेश दौऱ्यांवर होणारा अवाजवी खर्च करण्यापासून नागरिकांना परावृत्त करायचे आहे.