BS6 Phase 2 Norms: वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमावली दिवसेंदिवस कठोर करण्यात येत आहे. BS म्हणजेच भारत स्टेज नियमावली सर्वप्रथम 2020 पासून लागू झाल्यानंतर वाहनांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. आता BS6 नियमावलीचा दुसरा टप्पा आजपासून लागू झाला आहे. (BS6 phase 2 emission Norms) याचा परिणाम वाहन निर्मिती कंपन्यांवर जसा होईल तसाच तो सर्वसामान्य ग्राहकांवर देखील होईल. दुचाकी, कार किंवा इतर कमर्शिअल वाहन खरेदी करताना जास्त पैसे माजावे लागतील. तर प्रदूषणाचे नियम मोडले तर वाहन कंपन्यांना मोठा दंडही होऊ शकतो. पाहू या नव्या नियमांचा काय परिणाम होईल.
वाहनामधून किती प्रदूषण होते हा एक कळीचा मुद्दा आहे. यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. गाडी कोणत्या इंधनावर चालते, इंजिनचा प्रकार, वाहनाचा वेग, वजन, रस्ते अशा अनेक घटकांमुळे वाहनामधून होणारे प्रदूषण बदलते. (BS6 phase 2 rules impact on car price) यापूर्वी मात्र, वाहनांचे प्रदूषण प्रयोगशाळेतील चाचणीमध्ये तपासले जायचे. त्यानंतर कंपनीला गाडी बनवण्यास परवानगी दिली जायची. आता BS6 च्या दुसऱ्या टप्प्यात वाहनांची ऑन रोड चाचणी घेतली जाईल. तसेच रिअर टाईम म्हणजेच गाडी चालवताना किती इंधन वापरले जाते, प्रदूषण किती होते हे मॉनिटर केले जाईल. यामध्ये जर एखादी गाडी फेल ठरली तर कंपनीला दंड होईल.
काय आहे On Board Diagnostic डिव्हाईस?
वाहनातून किती प्रदूषण होते हे मोजण्यासाठी गाडीमध्ये On Board Diagnostic हा डिव्हाइस बसवणे या नव्या नियमांमुळे अनिवार्य झाले आहे. म्हणजेच गाडी चालवताना गाडी किती इंधन वापरते हे समजेल. यापूर्वीच्या नियमांनुसार प्रदूषण रोखण्यासाठी गाडीला बसवलेला फिल्टर, SCR यावर लक्ष देण्यात येत होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात रिअल टाइम प्रदूषणाच्या प्रमाणावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे.
वाहनांच्या किंमती किती वाढतील? (Car price After BS6 phase 2 rules)
प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांमध्ये जे डिव्हाइस बसवण्यात येतील त्यामुळे वाहन निर्मितीचा खर्च वाढेल. याचा बोजा कंपनी ग्राहकांवर टाकेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत वाहनांच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. इंधन प्रकारावरून वाहनाच्या किंमतीत बदल होईल. पेट्रोल कारपेक्षा डिझेल कार महाग होतील.
BS6 फेज दोन नियमावलीनुसार तयार केलेल्या दुचाकींच्या किंमती 2 हजार ते 10 हजारांपर्यंत वाढू शकतात. तर कारच्या किंमती 10 हजार ते 50 हजारांच्या दरम्यान वाढू शकतात. वाहन कंपनी आणि मॉडेलनुसार किंमतीत बदल होईल. काही डिझेल गाड्या निर्मिती बंद करण्यात आली आहे.