कोरोना काळात मनोरंजन क्षेत्राची झालेली वाताहत झाली होती. प्रेक्षकांनी दररोज गजबजणारी थिएटर्स कोरोना निर्बंधामुळे सुनसान भूत बंगल्यासाठी ओसाड पडली होती. मात्र, आता हे चित्र पालटले आहे. 2022 वर्षात देशातील थिएटर्सनी बॉक्स ऑफिसवर 10 हजार कोटींपेक्षा जास्त गल्ला कमावला आहे. कोरोनापूर्व म्हणजे 2019 साली जेवढी थिएटर्सनी कमाई केली होती त्या रकमेच्या जवळपास कमाई 2022 सालातही थिएटर्सनी केली. त्यामुळे 2023 मनोरंजन क्षेत्राच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बॉलिवूडला आणि हॉलिवूडलाही मागे सारत साऊथच्या चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे.
बॉलिवूड ब्लॉकबस्टर्सची संख्या रोडावली
मागील वर्षात बॉक्स ऑफिसवर थिएटर्सनी 10 हजार 637 कोटी रुपये कमावले, असे GroupM-Ormax Media ने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे. तर कोरोनाचा भारतात प्रसार होण्याआधी 2019 साली थिएटर्सनी 10 हजार 948 कोटी रुपये कमावले होते. चित्रपट निर्मिती क्षेत्रासाठी ही आनंदाची बाब आहे. चालू वर्षामध्ये 2019 साली झालेल्या कमाईचा रेकॉर्ड मोडू शकतो, असे बोलले जात आहे. तसेच 2022 वर्षात बिग बजेट चित्रपटांची संख्या कमी होती आणि जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या प्रसारामुळे निर्बंध लागू होते. असे असतानाही बॉक्स ऑफिसची कमाई चांगली झाली आहे.
2023 वर्षात बॉलिवूड, हॉलिवूडची, स्थानिक भाषांमध्ये अनेक चित्रपट निर्मितीच्या टप्प्यात आहेत. जर कोरोनामुळे पुन्हा निर्बंध आले नाही तर यावर्षी चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालू वर्षात बॉक्स ऑफिसची कमाई 11 ते 12 हजार कोटी होण्याची शक्यता, Ormax Media चे सीईओ Shailesh Kapoor यांनी म्हटले आहे.
2022 वर्षात बॉक्सऑफिस कलेक्शनमधील वाटा (Box office collation share of Indian Cinema)
हिंदी सिनेमा 33%
तेलगू सिनेमा 20%
तमीळ सिनेमा 16%
मागील वर्षात KGF Chapter 2 या सिनेमाने 970 कोटी रुपये कमाई करुन पहिला नंबर पटकावला. त्याखालोखाल RRR चित्रपटाने 869 कोटी रुपये कमावले. तर तिसऱ्या क्रमांकावर अवतार चित्रपट असून त्याने 471 कोटी रुपये कमावले. मागील वर्षात हिंदी आणि हॉलीवूड चित्रपटांनी चांगली कामगिरी केली नाही, असे अहवालात म्हटले आहे. दक्षिणात्य चित्रपट सृष्टीने हिंदी आणि हॉलिवूडला मागे टाकले आहे.
OTT चा परिणाम झाला नाही(Impact of OTT on Theaters)
कोरोना काळात आणि नंतरही OTT कंटेटची चलती होती. थिएटर्स बंद असल्याने नागरिकांनी OTT वरील कंटेट पाहण्यास पसंती दिली. चांगला दर्जेदार कंटेटही OTT वर येऊ लागल्याने प्रेक्षक तिकडे वळला. जय भीम सारखे मोठे चित्रपटही ओटीटीवर रिलिज झाले. मात्र, सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्सलाच पसंती दिली. मात्र, OTT मुळे थिएटर्सच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचेही मान्य करावे लागेल.