दिल्लीहून पुण्याला निघालेल्या स्पाइसजेटच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा फोन विमानतळावर आला. त्यामुळे एअरपोर्टवर गोंधळ उडाला. सुरक्षा यंत्रणांनी विमानाची धावपट्टीवरील मोकळ्या जागेत नेऊन तपासणी केली. काही काळ विमानतळावरील प्रवाशांना काय घडतंय हे कळत नव्हते. मात्र, बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन अफवा असल्याचे तपासणीतून समोर आल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. विमानामध्ये बॉम्ब सापडलाच नाही.
नक्की काय घडलं?
ही घटना काल गुरूवारी 12 जानेवारीला घडली. दिल्ली-पुणे अशी स्पाइसजेट कंपनीची नियमित फ्लाइट SG 8938 निघायला काही वेळ शिल्लक होता. मात्र, त्याचवेळी स्पाइसजेट कंपनीच्या आरक्षण विभागामध्ये एक निनावी फोन आला. पुण्याकडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती अज्ञान व्यक्तीने दिली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी विमान इतर विमानांपासून दूर नेत तपासणी केली. मात्र, या तपासणीमध्ये काहीही सापडले नाही. बॉम्ब ठेवल्याचा फोन अफवा असल्याची माहिती स्पाइसजेट कंपनीने प्रसिद्धी पत्रक देऊन केली. सुदैवाने फोन आला त्यावेळी विमानामध्ये प्रवासी बसले नव्हते. नाहीतर विमानामध्येही गोंधळ उडाला असता. या अफवेमुळे इतर विमानांनाही उशीर झाला.
विमानतळावरील पुलावर 1 तास अडकले प्रवासी
10 जानेवारीला बंगळुरूकडे जाणाऱ्या फ्लाइटमधील प्रवासी दिल्ली विमानतळावरील पुलावर अडकून पडले होते. विमानतळावरून विमानापर्यंत जाण्यासाठी जो ब्रिज असतो त्यावर काही प्रवासी तब्बल 1 तास अडकून पडले होते. खराब हवामानामुळे प्रवाशांना उशीर झाल्याचं नंतर स्पाइसजेट कंपनीने सांगितलं.
विमानतळावर सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवण्यात येते. याआधीही विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या अफवांचे फोन आले आहेत. मात्र, यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. सध्या दिल्लीमध्ये खराब हवामान विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिल्लीमध्ये हिवाळ्या धुके पसरल्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी होते. त्यामुळे फ्लाइट उशीराने धावतात.