Porous Concrete Technology: पावसाळ्यात मुंबईची होणारी तुंबई ही अवस्था नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा विषय आहे. मुंबईतील महानगरपालिका निवडणुका(Mumbai BMC Election) आता जवळ आल्या असून प्रत्येक पक्षाकडून असंख्य घोषणाही केल्या जात आहेत. मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा ही काही मुंबईकरांसाठी नवी बाब नाही. मुंबईमध्ये जागतिक दर्जाचे आणि खड्डेमुक्त रस्ते बनवण्यासाठी आता महानगर पालिकेने(BMC) एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एका आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून पालिका रस्त्यांची बांधणी करणार आहे, ज्यामुळे भर पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही.
महानगरपालिकेचे(BMC) महत्त्वपूर्ण पाऊल
महानगरपालिका मुंबईत तब्बल 397 किमी अंतराचे काँक्रिटचे रस्ते बांधणार असून, त्यासाठी साधारण 6 हजार कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. या निविदांमध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचा अनुभव असणाऱ्या मोठ्या कंत्राटदारांचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या रस्तेबांधणीसाठी अनेक मुद्दे लक्षात घेतले जाणार आहेत. सर्वसामान्य काँक्रीटचा वापर न करता यावेळी 'पोरस' काँक्रीटचा(Porous Concrete Technology) वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामस्वरुप पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर पाण्याचा निचरा होऊन, रस्त्यांवर तुंबणाऱ्या पाण्याची (water logging) समस्या काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.
Porous Concrete चे वेगळेपण काय आहे?
पोरस काँक्रीटमध्ये(Porous Concrete) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून ज्यामुळे हे काँक्रीट पाणी शोषून घेते. पोरस काँक्रीटमध्ये असणाऱ्या छिद्रांमधून रस्त्यावरील पाण्याचा निचरा वेगाने होतो. फक्त रस्तेच नव्हे, तर फुटपाथसाठी सुद्धा हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरणार आहे.यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांना तुंबईच्या त्रासापासून सुटका मिळणार आहे.
आजच्या घडीला बीएमसीच्या हद्दीत जवळपास 2 हजार किमीचे रस्ते असून जे पूर्णपणे काँक्रीटचे करण्याचे धोरण पालिका(BMC) राबवताना पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील 1 हजार किमी रस्त्यांचे कामकाज पूर्ण झाले असून, उर्वरित काम टप्प्याटप्प्याने होणार आहे.