स्वस्तात विमान प्रवासाची सेवा देणाऱ्या गो फर्स्टच्या (Go First) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या गो फर्स्ट एअरलाइन्सने आता आपला गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीकडून आता खरेदीदारांचा शोध सुरू करण्यात आला आहे. यासाठी कंपनीने इच्छुक खरेदीदारांकडून स्वारस्य पत्रांची (Expression of Interest) मागणी केली आहे. या संदर्भात कंपनीकडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
11463 कोटींचे कर्ज
आर्थिक संकटाचे कारण देत 3 मे पासून Go First ने विमान सेवा बंद ठेवली होती. त्यानंतर वाडिया ग्रुपने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (NCLT) ऐच्छिक दिवाळखोरीची याचिका दाखल केली होती. लवादाने ती याचिका मान्य करत अभिलाष लाल यांची इंटरिम रिझोल्युशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती केली होती. गो फर्स्ट'वर एकूण 11463 कोटींचे कर्ज आहे. दिवाळखोरीच्या याचिकेनुसार बँक ऑफ बडोदाचे 1300 कोटी, आयडीबीआय बँकेचे 50 कोटी आणि सेंट्रल बँकेचे 2000 कोटींचे कर्ज आहे.
Go First साठी खरेदीदारांचा शोध
एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) अंतर्गत कंपनीने औपचारिकपणे संभाव्य गुंतवणूकदार आणि गुंतवणूक शोधण्यास सुरुवात केली आहे. यासाठी GoFirst ची मालकी असलेल्या वाडिया ग्रुपने यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक कंपन्या 9 ऑगस्टपर्यंत त्यांच्या बोली सादर करू शकतात. 19 ऑगस्ट 2023 पर्यंत बोलीदारांची तात्पुरती यादी जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर या तात्पुरत्या यादीवर 24 ऑगस्ट रोजी हरकती मागवण्यात येणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वाडिया समूहही लावू शकतो बोली-
या कंपनीच्या बोलीमध्ये वाडिया ग्रुपही सहभागी होण्याची शक्यता आहे. गो फर्स्टसाठी संयुक्तपणे बोली लावण्यासाठी वाडिया समूह इतर काही खासगी इक्विटी फंड आणि पर्यायी गुंतवणूकदारांशी बोलणी करत आहे. वाडिया ग्रुप गो फर्स्टची सेवा सुरू ठेवण्यासाठी इच्छुक असल्याचे वृत्त ईकोनॉमिक्स टाईम्सने दिले आहे.
गो फर्स्ट या विमान कंपनीच्या आर्थिक अडचणींमुळे 3 मे पासून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आता विमान कंपनीने 12 जुलैपर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. त्याची मुदत पुन्हा पुन्हा वाढवली जात आहे. विशेष म्हणजे, गो फर्स्ट एअरलाइनने ऑपरेशन्स बंद करण्यासाठी अमेरिकन इंजिन निर्माता प्रॅट अँड व्हिटनीला जबाबदार धरले आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            