भारत पे (BharatPe) स्टार्टअपचे संस्थापक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी 2022 च्या आर्थिक वर्षात 1.69 कोटी रुपये इतका पगार घेतला. तर त्यांची पत्नी आणि पूर्वी कंपनीत अधिकार पदावर असलेल्या माधुरी जैन (Madhuri Jain) यांना याच कालावधीत 63 लाख इतका पगार मिळाला. कंपनीने अलीकडे एका कायदेशीर प्रकरणात ही माहिती दिली आहे.
ग्रोव्हर दांपत्याला गेल्यावर्षी या युनिकॉर्न कंपनीतून आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपावरून पायउतार व्हावं लागलं होतं. याच घोटाळ्यामुळे कंपनी सोडलेले माजी CEO सुहैल समीर यांना 2.1 कोटी रुपये इतका पगार मिळाला. तर भारत पेचे अध्यक्ष आणि स्टेट बँकेचे माजी प्रमुख रजनीश कुमार यांना 21 लाख रुपये पगार मिळत होता.
सुहैल समीर (Suhail Sameer) अगदी डिसेंबर 2022 पर्यंत कंपनीत कार्यरत होते. याशिवाय आणखी एक संस्थापक शाश्वत नाडकर्णी (Shashwat Nadkarni) यांना 28.8 लाख रुपये मोबदला मिळाला. आणि केवल हंडा यांना 36 लाख रुपये मिळाले. हा फक्त आर्थिक मोबदला आहे. कंपनीचे शेअर त्यांच्याकडे असतील तर त्याचं मूल्यांकन झालेलं नाही.
अश्नीर ग्रोव्हर सध्या कंपनीमध्ये सक्रिय नाहीत. कारण, त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप झाले होते. त्यावेळी झालेल्या भांडणादरम्यान ग्रोव्हर यांनी कंपनीच्या अधिकारी वर्गावर कंपनीचे 315 कोटी रुपये खर्च होत असल्याबद्दल टीका केली होती. त्यामुळे स्वत: ग्रोव्हर यांनी मोबदल्या दाखल किती रक्कम कंपनीतून उचलली हे जाणून घ्यायला स्टार्टअप उद्योग क्षेत्र उत्सुक होतं.
ग्रोव्हर यांनी कंपनी सोडण्यापूर्वी समभागधारक, गुंतवणूकदार आणि संचालक मंडळाला एक पत्र लिहून रजनीश कुमार, शाश्वत नाडकर्णी तसंच सुहैल समीर हा अधिकारी वर्ग मोबदल्यादाखल सगळ्यात जास्त पैसे घेत असल्याचा दावा केला होता. पण, आता जे आकडे समोर आले आहेत, त्यात ग्रोव्हर यांनी उचललेला मोबदलाच जास्त असल्याचं दिसतंय. हे आकडे आर्थिक वर्ष 2021-22 साठीचे आहेत.
त्यानंतर भारत पे कंपनीने अश्नीर ग्रोव्हर यांच्यावर आर्थिक फसवणुकीसाठी दावा ठोकला. आणि त्यांच्याकडून 88 कोटी रुपये वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या दरम्यान कंपनीने आर्थिक ऑडिट करून घेतलं असता ही माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्षं 2022-23 मध्ये भारत पेला 5,610 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
आणि हा तोटा अधिकारी वर्गाला हिस्सेदारीत दिलेल्या शेअरच्या मूल्यांकनात केलेल्या बदलामुळे झाला आहे. या शेअरचं मूल्य अलीकडच्या काळात घटवण्यात आलं होतं.