एकीकडे मुंबईसह महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी बेस्ट (BEST) ने आपल्या वातानुकूलित बसेसच्या अमर्यादित प्रवासाच्या दैनंदिन पासचे दर 60 रुपये वरून 50 रुपये पर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. तसेच मासिक पासचा दरही 1750 रुपयांवरुन 1250 रुपये करण्यात आला आहे.
प्रवाशांना दिलासा
तसे बघितल्यास मुंबईमधील सर्वच प्रवासी प्रवास करण्यास लोकल ला सर्वप्रथम प्राधान्य देतात. मात्र, अनेक ठिकाणी ये-जा करण्यास प्रवाशांना बेस्टच्या बसचा आधार घ्यावा लागतो. मुंबईतील बेस्टच्या सर्व बसेस या वातानुकूलित आहे. त्यामुळे बेस्टच्या दैनंदिन पासचे आणि मासिक पासचे दर कमी करण्याचा हा निर्णय नागरिकांना उन्हाळ्यात नक्कीच दिलासा देऊन जाईल.
ऑनलाईन पासची देखील सुविधा
त्याचप्रमाणे मुंबईतील नागरीकांसाठी देण्यात येणारे डिजीटल तिकिट हे प्रवाशांना सहजतेने समजेल असे आणि आधिक आकर्षक बनविण्यात आले आहे. आणि शक्रवारपासुन हे अंमलात आणले जाणार आहे. त्यासाठी अनेक ऑनलाईन पास अपडेट होणार आहेत.
प्रवाशांचा गरजा लक्षात घेऊन…
बेस्ट कंपनी मुंबई शहर आणि उपनगरांव्यतिरिक्त शेजारच्या ठाणे,नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरांना सार्वजनिक बस सेवा पुरवते.सुमारे 3300 हून अधिक एसी आणि नॉन-एसी बसेस मधून 30 लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. त्यामुळे बेस्टने सर्व प्रकारच्या प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता, विविध प्लान्स आणले आहेत. यासाठी योजना बेस्ट चलो मोबाईल अॅप्लिकेशन आणि बेस्ट चलो कार्ड या दोन्हीचा लाभ प्रवासी घेऊ शकणार आहे, अशी माहिती परिवहन मंडळाने दिलेली आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ही मुंबईची सार्वजनिक वाहतूक आणि वीज पुरवठा करणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1873 मध्ये झाली. ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक बस सेवा ऑपरेटर कंपनी आहे.