तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची जोखीम न घेता पैशांची गुंतवणूक करायची असेल तर सरकारच्या या बचत योजना आहेत. ज्यात तुम्ही बिनधास्तपणे गुंतवणूक करू शकता. अनेक योजनांवर परतावाही चांगला मिळतो आणि काही योजनांवर टॅक्स सवलतीची सुविधा ही आहे. या योजनांवरील व्याजदर सरकार वेळोवेळी बदलत असते.
भारत सरकारच्या बेस्ट गुंतवणूक योजना
1. सुकन्या समृद्धी योजना (SSY)
मुलीच्या जन्मापासून ते ती 10 वर्षांची होईपर्यंत सुकन्या समृद्धि योजनेद्वारे मुलीच्या नावावर गुंतवणूक करू शकता. एका वर्षात कमीतकमी 1 हजार रूपये ते जास्तीत जास्त 1.5 लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. सध्या या योजनेवर 7.6 टक्के व्याज मिळते. वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत ही योजना सुरू राहते. त्यानंतर मुली या खात्यातून पैसे काढू शकतात. साधारणत: या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम 9 वर्ष 4 महिन्यांत दुप्पट होते.
2. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)
राष्ट्रीय पेन्शन योजना ही भारत सरकारच्या लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. ही सेवानिवृत्ती बचत योजना सर्व भारतीयांसाठी खुली आहे; तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य आहे. 18 ते 60 वयोगटातील नागरिक कोणत्याही बॅंकेत NPS खाते उघडू शकतात. या योजनेत गुंतवणूक करून प्राप्तीकरात एकूण 2 लाख रूपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकता. महिन्याला 1 हजार रूपयांपासून गुंतवणूक करू शकता.
3. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)
ही भारतातील सर्वात जुन्या सेवानिवृत्त योजनांपैकी लोकप्रिय टॅक्स बचत योजना आहे. याचा गुंतवणूक कार्यकाल 15 वर्ष आहे. पीपीएफ खात्यात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. सध्या या योजनेवर 7.1 टक्के इतका परतावा मिळत आहे. PPF खाते कोणत्याही बॅंकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते.
4. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)
भारतीयांच्या बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारतर्फे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतो. याचा लॉक इन कालावधी 5 वर्षांचा असतो. सध्या NSC वर 6.8 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर 80C अंतर्गत टॅक्सवर सूट मिळते.
5. अटल पेन्शन योजना (APY)
अटल पेन्शन योजना ही भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे. दुर्बल घटकातील व्यक्तींना पेन्शनचा पर्याय निवडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो. वयाच्या 60 वर्षापर्यंत या योजनेत प्रीमियम भरावा लागतो. त्यानंतर 1 ते 5 हजार रूपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.
6. प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY)
समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना शून्य बॅलन्सवर बॅंक खाते उघडण्यासाठी तसेच कर्ज, हस्तांतरण सुविधा, विमा, निवृत्तीवेतनाची सुविधा आदी विविध आर्थिक सेवांचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने ही योजना सुरू केली. या खात्यातून फ्री मोबाईल बॅंकिंगची सुविधा मिळते. तसेच 2 लाख रूपयांचा अपघात विमा लागू होतो. 10 वर्षावरील कोणताही नागरिक जनधन खाते सुरू करू शकतो.
7. प्रधानमंत्री वय वंदन योजना
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही गुंतवणूक योजना आहे. यात एकरकमी पैसे गुंतवणूक करून मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वर्षाला पेन्शन घेऊ शकता. पेन्शनचा कालावधी 10 वर्षे असून या योजनेतील गुंतवणुकीवर दरवर्षी 7.4% व्याजदराने परतावा मिळतो.
8. सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB)
नोव्हेंबर 2015 मध्ये भारत सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे ही योजना आणली. खरेदी केलेले सोने तिजोरी किंवा लॉकरमध्ये सांभाळून ठेवण्याची जोखीम पत्करण्यापेक्षा हे बॉण्ड म्हणजे प्रत्यक्ष सोन्याला सुरक्षित पर्याय आहे. SGB भारत सरकारच्यावतीने रिझर्व्ह बॅंकेकडून दिले जातात. त्यामुळे ही पूर्णतः सुरक्षित आहे.