PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना बँकेत खाते उघडण्यासह, ते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्ट कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी खाती उघडण्याची मोहीम इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत 1 ते 12 फेब्रुवारीदरम्यान राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.
बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक (Mandatory to link bank account with Aadhaar number)
केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे सहा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो. या योजनेच्या 13 व्या हप्त्यांचा लाभ जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू असून, त्यासाठी लाभार्थींनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. राज्यात सद्य:स्थितीत 14 लाख 32 हजार लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत.
बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी लाभार्थींनी आपले आधार कार्ड, मोबाइल क्रमांक इत्यादी कागदपत्रांच्या आधारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (India Post Payments Bank) आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत खाते उघडावे. हे खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासांत जोडले जाणार आहे.ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाती आयपीपीबीमध्ये उघडून ती आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थींना संपर्क करून आयपीपीबीमध्ये बँक खाती सुरू करतील.