Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आनंदाची बातमी! BDO कंपनी भारतात 25 हजार नोकरभरती करणार

BDO company job

Image Source : www.consultancy.org.com

सगळीकडून नोकरकपातीच्या बातम्या येत असताना नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. फायनान्शिअल सेवा पुरवणारी BDO कंपनी 25 हजार नोकरभरती करणार आहे. भारतातील पुणे, मुंबई सह अनेक मोठ्या शहरांत कंपनीची कार्यालये आहेत.

BDO Hiring: सगळीकडून नोकरकपातीच्या बातम्या येत असताना नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. फायनान्शिअल सेवा पुरवणारी BDO कंपनी 25 हजार नोकरभरती करणार आहे. भारतातील व्यवसाय वृद्धीसाठी कंपनीने नियोजन आखले असून पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने 25 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेतले जाणार आहे. सध्या कंपनीमध्ये 5 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. 

BDO कंपनीत नोकरीची संधी (Hiring in BDO)

मुंबई, दिल्ली, बंगळुरु, पुणे, हैदराबादसह इतरही मोठ्या शहरात कंपनीची कार्यालये आहेत. BDO कंपनी मुळची बेल्जियम देशातील असून तेथेच तिचे मुख्यालय आहे. अकाउंटिंग, कर, ऑडिट, आर्थिक सल्लागार आणि इतर व्यावसायिक सेवा कंपनीकडून पुरवण्यात येतात. वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही नोकरीची मोठी संधी आहे.

2028 पर्यंत ही नोकरभरती करण्यात येणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिलिंद कोठारी यांनी सांगितले. मागील दहा वर्षांच्या काळात कंपनीने भारतामध्ये आपला जम बसवला आहे. कंपनीच्या ऑडिट सेवेचा विस्तार वार्षिक 40 ते 45% होत आहे. सोबतच सल्लागार सेवा आणि आउटसोर्सिंग कामांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात नोकरभरती केली जाणार आहे, असे कोठारी यांनी सांगितले.

EY, डेलॉइट, PwC आणि KPMG या चार आर्थिक सेवा पुरवणाऱ्या मुख्य कंपन्या आहेत. त्यांच्यासोबत BDO कंपनीची स्पर्धा आहे. नुकतेच PWC कंपनीने भारतात मोठी नोकरभरती करणार असल्याचे जाहीर केले होते. " आम्ही सध्या भारतातील सहावी मोठी ऑडिट कंपनी आहोत. तसेच आमची दरवर्षी 40% ने वाढ होत आहे. पारंपरिक सेवा देण्याबरोबरच तंत्रज्ञानावर आधारित सेवांमध्येही भविष्यात वाढ होईल, असे, मिलिंद कोठारी यांनी सांगितले.

माहिती तंत्रज्ञान सह इतरही अनेक क्षेत्रातील कंपन्यांचा विकास खुंटला असून अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले जात आहे. जागतिक स्तरावर मंदीची शक्यता निर्माण झाली असून अस्थिर परिस्थितीत खर्च कमी करण्याकडे कंपन्यांचा ओढा आहे. गुगल, फेसबुक, अॅमेझॉन, मेटा सह इतरही अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. नुकतेच एरिक्सन या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीने 8500 कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला.