कार खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते. मोठ्या कुटुंबासाठी तर कार म्हणजे घरातील एक अत्यावश्यक गरज झाली आहे. नोकरदार व्यावसायिक यांच्या प्रमाणे आता शेतकरीवर्ग देखील कार खरेदीला प्राधान्य देताना दिसत आहे. बागायती शेतीतून मिळणारे आर्थिक उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांच्या घरात सुख समृद्धी आली आहे. दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्रकडून शेतकऱ्यांना आता चारचाकी कार खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज (Car Loan) उपलब्ध करून दिले जात आहे. आज आपण या कर्जाची प्रक्रिया काय आहे? ते जाणून घेणार आहोत.
बँक ऑफ महाराष्ट्र कडून शेतकऱ्यांना नवीन चारचाकी वाहने खरेदी करण्यासाठी वित्तपुरवठा करण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन चार चाकी वाहन म्हणजे कार, एसयूव्ही, जीप, बहुउद्देश्यीय वाहने (एमयूव्ही) यासाठी कृषी टर्म लोन अंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. बँकेकडून शेतकऱ्याला बँकेच्या कर्ज योजनेतील समाविष्ट वाहन घेण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे.
काय आहे पात्रता?
बँक ऑफ महाराष्ट्राकडून शेतकऱ्यांसाठी खास वाहन कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी कर्ज घेणारी व्यक्ती हा शेतीचा मालक असावा, तसेच स्वत:च्या शेतजमिनीसह दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, रेशम शेती, मत्स्यपालन इत्यादींसारखा जोडधंदा करणारा व्यक्ती असावा. अर्जदार व्यक्ती 18 वर्षाच्या पुढील असावा. तसेच अर्जदाराने वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे. किंवा त्यांच्याकडे ड्रायव्हिंग परवाना धारण करणारा चालक असावा. अर्जदाराचे किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यास कोणत्याही बँकेकडे किंवा आर्थिक संस्थांकडे कर्जाचा बोजा असू नये.
कर्जाचे निकष, व्याजदर
अर्जदाराने एकूण वार्षिक उत्पन्न किमान 3.00 रुपये असावे . तसेच अर्जदाराकडे आपल्या मालकीचे किमान 4 एकर बागायती अथवा किमान 6 एकर कोरडवाही जमीन असावी. 10 लाखांपर्यंतचे कर्ज मंजुर करत असताना वाहनाच्या किंमतीच्या 25% मार्जिन आणि आरटीओ शुल्क भरणे आवश्यक आहे. यासाठी 1 वर्षाचे एमसीएलआर(8.50% +0.25%) वार्षिक व्याजदर आकारला जाईल.(व्याजदरामध्ये वेळोवेळी बदल होत राहतात कर्ज घेताना तुम्ही बँकेकडून खात्री करणे आवश्यक)
कर्जाची परतफेड
बँकेकडून शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 5-7 वर्षांच्या कालावधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कर्जाचे हप्ते हे मासिक / तिमाही / सहामाही / वार्षिक हप्ते यानुसार उपलब्ध केले जाईल. कर्जाच्या परतफेडीचे हप्ते हे नगदी पिकाचा हंगाम याच्याशी निगडीत ठरवले जातील, उदाहरणार्थ उसाची बिले ही डिसेंबर मध्ये मिळतात. त्यावेळी तुमच्याकडून हप्ता वसूल केला जाऊ शकतो.
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- वाहनाचे कोटेशन, डीलर्कडून इनव्हॉइस / पावती
- आरसी बुकची कॉपी
- वाहनाचा विमा आवश्यक आहे
- कर्जाचा अर्ज म्हणजेच फॉर्म नं -138, संलग्नन – ब2
- अर्जदाराच्या 7/12, 8 ए, 6 ड
- संस्थांकडून अर्जदाराची कोणतीही देय रक्कम नसल्याचा दाखला
- यासह बँक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सांगितलेली आवश्यक कागदपत्रे