Car Loan in Festival Season: सणांचा हंगाम सुरू झाला आहे. नुकताच गणेशोत्सव संपला आणि कालपासून नवरात्रौत्सव सुरू झाला. त्यामुळे बाजारातील फेस्टिव सीझन अजून काही संपलेला नाही. त्याता पुढे दसरा आणि दिवाळी आहे. या फेस्टिव्ह सिझनमध्ये तुम्ही जर कर्ज घेऊन कार घेणार असाल, तर तुमच्यासाठी बऱ्याच ऑफर्स उपलब्ध असणार आहेत. पण त्यापूर्वी तुम्ही ईएमआयचा डोलारा कसा सांभाळणार आहात, याची तयारी करून घ्या.
पूर्वी गाडी विकत घेणं हे श्रीमंतीचं प्रदर्शन केल्याचं मानलं जात होतं. पण कार आता गरजेची वस्तू बनली आहे. म्हणजे यामुळे अनेकांची सोयी होते, वेळ वाचतो. कुटुंबाला एकत्रितपणे फिरता येते. तसेच आता गाडी खरेदी करण्यासाठी अनेक बँका कर्जही झटपट उपलब्ध करून देत असल्याने कार विकत घेणं तितकिशी मोठी गोष्ट राहिलेली नाही. पण कर्ज काढून गाडी विकत घेताना, त्याचे बजेट, त्यासाठी लागणारे कर्ज, डाऊन पेमेंटची रक्कम, कर्जाचा कालावधी, महिन्याचा ईएमआय आणि कारमुळे तुमच्या एकूण बजेटमध्ये किती खर्च वाढू शकतो, याचा अंदाज घेणे गरजेचे आहे. तर आज आपण यातून व्यावहारिक मार्ग कसा काढता येऊ शकेल, हे पाहणार आहोत.
उत्सवादरम्यान कर्ज घ्यावे का?
सणांच्या पार्श्वभूमीवर गाडीसाठी कर्ज घ्यावे का? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकते. कारण कर्ज ही सध्याच्या काळातील गरज बनली आहे. पैसे साठवून एखादी वस्तू घेण्याऐवजी कर्ज काढून ती वस्तू घेणे सोपे ठरू शकते. अर्थात ते कर्ज प्रत्येकाला किती परवडू शकते. जसे की त्याचा ईएमआय, त्याचा इंटरेस्ट रेट पाहूनच कर्ज घेणे उचित आहे. उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अनेक बँका व्याजदरामध्ये सवलत देतात. त्यामुळे या सवलतींचा लाभ नक्कीच घेता येऊ शकतो.
20-4-10 नियम काय आहे?
वैयक्तिक वित्त (Personal Finance) सांभाळताना आपली आर्थिक ओढाताण होऊ नये. यासाठी काही आर्थिक तज्ज्ञांनी विविध नियम तयार केले आहेत. त्या नियमांना धरून व्यवहार केले तर तुमचे आर्थिक गणित कोलमडणार नाही. जसे की गाडीसाठी कर्ज काढताना 20-4-10 चा नियम सांगितला जातो. या नियमानुसार गाडी खरेदी करताना गाडीच्या किमतीच्या 20 टक्के रक्कम डाऊन पेमेंट म्हणून द्यावी. तसेच गाडीसाठी घेतलेल्या कर्जाचा कालावधी जास्ती जास्त 4 वर्षांचा ठेवावा आणि कर्ज घेतल्यानंतर जो मासिक ईएमआय भरावा लागणार आहे. तो महिन्याच्या पगाराच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. या पद्धतीने तुम्ही जर गाडीसाठी कर्ज घेणार असाल तर तुमची आर्थिक ओढाताण होणार नाही.
गाडीसाठी कर्ज घेताना वरील नियमाचा वापर केला तर तु्म्हाला मासिक खर्चाचा तितकासा ताण येणार नाही. कारण गाडीच्या कर्जाव्यतिरिक्त तुमचे अजून दुसरे छोटे-मोठे कर्ज असेल तर तुम्हाला महिन्याच्या खर्चाव्यतिरिक्त गाडीचे पेट्रोल, इंधन आणि मेन्टेन्ससाठी अतिरिक्त खर्च बाजूला काढून ठेवावा लागणार आहे. त्यामुळे पुरेस कर्ज मिळत असले तरी उत्पन्नातील सर्व पैसे कर्जाच्या ईएमआयवर खर्च होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला 20-4-10 हा नियम नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.