Bank Holidays: बँक कर्मचाऱ्यांना लवकरच खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. सरकारी आणि खासगी बँकांच्या कर्मचारी संघटनांनी पगारवाढ आणि 5 दिवसांचा आठवडा करण्याची मागणी लावून धरली आहे. या मागणीवर चर्चा सुरू असून अर्थमंत्रालयही या बोलणीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांनी बँकांनाही शनिवार आणि रविवारची सुट्टी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पगारवाढीची मागणी किती?
मागील काही वर्षांत सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांचा नफा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आयटी आणि इतर क्षेत्रे मागे पडली असताना बँकांचा ताळेबंद मजबूत झाला आहे. या नफ्यातील फायदा कर्मचाऱ्यांना मिळावा, अशी मागणी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांची आहे. सुमारे 15% पगारवाढ करावी, अशी मागणी होत आहे.
इंडियन बँक असोसिएशनने 15% पगारवाढ सुचवली होती. मात्र, त्यापेक्षाही जास्त टक्क्यांनी पगारवाढ मिळावी, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, यावर चर्चा सुरू असून अर्थ मंत्रालयही घडामोडींकडे लक्ष देऊन आहे. काही बँकांनी आत्ताच पगारावाढीसाठी काही रक्कम बाजूला काढून ठेवण्यास सुरूवात केली आहे.
कोरोना काळात बँक कर्मचाऱ्यांनी कठीण परिस्थितीत काम केले. बँकिंग क्षेत्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळावी, असे बँक संघटनेचे म्हणणे आहे.
पाच दिवसांचा आठवडा होणार का?
दरम्यान, बँकांच्या कामकाजाचे आठवड्यात 5 दिवस करावेत, अशी मागणी संघटनांची आहे. कारण, कॅश संबंधीत 70% व्यवहार डिजिटल पद्धतीने होऊ लागले आहेत. शाखेत येऊन काम पूर्ण करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.
काही अपरिहार्य परिस्थितीतच ग्राहकांना बँकेत यावे लागते. त्यामुळे यापुढे 5 दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. यापूर्वी 2020 साली बँक कर्मचाऱ्यांना सखोल वाटाघाटीनंतर पगारवाढ मिळाली होती. मात्र, आता पुन्हा संघटना अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत.