प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कारमध्ये सीट बेल्टची व्यवस्था करण्यात आलेली असते. मात्र अनेकजण सीट बेल्ट लावणं टाळतात. तसंच सीट बेल्ट अलार्म स्टॉपरचा वापर करतात. विविध ई-कॉमर्स (E-Commerce) साइट्स सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप विकतायत आणि लोकदेखील बिनदिक्कतपणे त्या ऑर्डर करत आहेत. मात्र आता सीसीपीए म्हणजेच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं या ई-कॉमर्स साइट्सना कठोर शब्दात आदेश दिले आहेत. या कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवरून (Websites) सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप हटवाव्यात, असं या आदेशात म्हटलंय.
Table of contents [Show]
रस्ते वाहतूक मंत्रालयानं केली होती तक्रार
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं (Central Consumer Protection Authority) अॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart), स्नॅपडील (Snapdeal), शॉपक्लूज (Shopclues) आणि मीशो (Meesho) यांना हे आदेश देण्यात आले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. याविषयी अधिकची चौकशी करण्यात आली होती. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणानं हा आदेश जारी केलाय. या आदेशानुसार या कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवरून सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप विकता येणार नाही.
इतर उत्पादनं म्हणून विक्री
सिगारेट लाइटर, बॉटल ओपनर अशा प्रकारात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्टॉपर्सची विक्री केली जात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. सीसीपीएनं वेबसाइटवरून सर्व उत्पादनं तत्काळ डी-लिस्ट करण्याचे आदेश दिलेत. त्यासोबतच राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून असे उत्पादन युनिट बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आदेशानंतर या पाच ई-कॉमर्सवरच्या 13,118 सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप डी-लिस्ट करण्यात आल्या आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालय विभागाच्या तक्रारीनंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं ही कारवाई केली.
विमा काढताना येवू शकतात अडचणी
सीट बेल्ट अलार्म स्टॉपर अडचणीचं ठरतं. वाहनाच्या विमा पॉलिसी क्लेम करण्यात अडचणी येऊ शकतात. विमा कंपन्या दाव्याची रक्कम देण्यास नकार देऊ शकतात. कारण सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप वापरणं नियमाच्या विरुद्ध आहे. वाहनधारकानं नियमाचं उल्लंघन केल्याचं कारण पुढे केलं जाऊ शकतं.
सीट बेल्ट न वापरणं जीवघेणं
सीट बेल्ट न वापरणं जीवघेणं ठरू शकतं. रस्ते वाहतूक मंत्रालयानं यासंदर्भात आकडेवारीदेखील जारी केलीय. या अहवालानुसार, सीट बेल्ट न लावल्यामुळे 2021मध्ये 16,000 लोकांना आपला जीव गमावावा लागला. यात 8,438 जण चालक तर 7,959 प्रवासी होते. याशिवाय 39,231 लोक जखमी झाले, ज्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता. त्यापैकी 16,416 चालक आणि 16,416 प्रवासी होते. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनाही आपला जीव गमवावा लागला होता. विविध एनजीओ आणि इतर संस्थांच्या सर्वेमध्ये भारतात सीट बेल्ट वापरणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी तर अपघाती म़त्यूदर जास्त आहे. सुरक्षेसाठी चालकासह इतर सर्वांनाच सीट बेल्ट बंधनकारक करण्यात आलाय. मात्र प्रवाशांकडून त्याचं पालन केलं जात नाही.