Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ram Navami 2023: डिसेंबर अखेर पूर्ण होणार श्रीराम मंदिर, जाणून घ्या किती येणार खर्च!

Ram Navami

Ram Mandir: श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथील मंदिर बांधण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. संघर्षाची किनार असलेल्या या मंदिराची उभारणी भव्य-दिव्य झाली पाहिजे असा सामान्य भक्तांची इच्छा होती. यासाठी मंदिर ट्रस्टतर्फे देशभरातून देणगी देखील जमा केली गेली होती.

आयोध्यते आज श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जातो आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अनेकांच्या आस्थेचा विषय आहेत. आयोध्येत सध्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचे बांधकाम सुरु असून पुढच्या वर्षीचा राम नवमीचा उत्सव नूतन मंदिरात साजरा केला जाणार आहे.

यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापन समितीने दिली आहे. योजनेनुसार पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी रामलला म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मुख्य मंदिराच्या गर्भगृहात केली जाणार आहे.

मंदिर निर्माणाचे बजेट 

श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथील मंदिर बांधण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. संघर्षाची किनार असलेल्या या मंदिराची उभारणी भव्य-दिव्य झाली पाहिजे असा सामान्य भक्तांची इच्छा होती. यासाठी मंदिर ट्रस्टतर्फे देशभरातून देणगी देखील जमा केली गेली होती. सप्टेंबर 2022 मध्ये ट्रस्टच्या एका बैठकीत मंदिर निर्माणासाठी 1800 कोटी रुपयांची आवश्यकता लागणार असल्याचे जाहीर केले गेले आहे.

मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत 400 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. जवळपास 70 एकर परिसरात हे भव्यदिव्य मंदिर बांधले जाणार आहे. या मंदिर परिसरात मुख्य श्रीराम मंदिरासोबतच आणखी सात मंदिरे बांधली जाणार आहेत. यात राजा निषाद, जटायू, माता शबरी, महर्षी अगस्त्य, महर्षी विश्वामित्र, महर्षी वशिष्ठ आणि महर्षी वाल्मिकी यांचे देखील मंदिर उभारले जाणार आहे. कोणते मंदिर कुठे असेल हे देखील ट्रस्टतर्फे आगोदरच ठरवले गेले आहे. संपूर्ण मंदिराचे बांधकाम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण केले जाणार आहे.

देणग्यांचा ओघ सुरूच!

9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येच्या वादग्रस्त भूमीवर रामललाचे मंदिर बांधण्याचा निर्णय दिला होता.. यासोबतच तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या विशेष खंडपीठाने रामजन्मभूमीवर मंदिर उभारणीसाठी स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

यानंतर, 5 फेब्रुवारी 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा केली होती. सदर ट्रस्टचे नाव 'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र' असे ठेवण्यात आले आहे.

या ट्रस्टमार्फत देशभरातून मंदिर निर्माणासाठी देणग्या घेण्यात आल्या आहेत. मंदिराचे बांधकाम सुरु असतानाच अनेक भाविक येथे भेट देण्यासाठी येत आहेत. मंदिराच्या दानपेटीत भाविक मोठ्या श्रद्धेने देणगी देत असतात. दर 10 दिवसांनी दानपेटी उघडली जाते आणि आलेल्या देणग्यांची मोजणी होत असते.

राम मंदिर निर्माणासाठी प्राप्त झालेल्या देणग्यांमध्ये जानेवारीपासून तिप्पट वाढ झाल्याचे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. गेल्या पंधरा दिवसांत तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी ट्रस्टला प्राप्त झाली आहे. ट्रस्टचे स्टेट बँक ऑफ इंडियात खाते असून दानपेटीत आलेली रक्कम मोजणीनंतर बँक खात्यात जमा केली जाते. देणग्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मोजणीसाठी 10-15 दिवसांचा कालावधी लागतो आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने या कामासाठी खास 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.