Women Hiring In Auto: भारतामध्ये आघाडीच्या ऑटो कंपन्यांकडून महिलांना नोकरीत प्राधान्य देण्यात येत आहे. जेंडर बॅलन्स म्हणजेच पुरुषांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी नव्याने नोकर भरती करताना खास महिलांसाठी जास्त जागा ठेवण्यात येत आहेत. मारुती सुझुकी, हिरो मोटो कॉर्प, मर्सेडीज बेंझ, टाटा मोटर्स महिंदा अँड महिंद्रा या कंपन्यांमध्ये महिलांना संधी वाढत आहेत. कॅम्पस भरतीद्वारे जास्तीत जास्त महिलांना हायर केले जात आहे.
अॅसेंब्ली लाइन आणि फ्लोअरवर जेथे गाड्यांची निर्मिती केली जाते त्या ठिकाणी महिलांची संख्या अत्यंत कमी होती. (Women Hiring In Auto companies) अवजड काम असल्याने फक्त पुरुषांनाच अशा ठिकाणी नेमले जायचे. मात्र, आता ऑटो क्षेत्रामध्ये ऑटोमेशन, रोबोटिक तंत्रज्ञान वाढत आहे. महिलाही सर्व कामे करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे कंपन्यांच्या विचारसरणीत बदल होत असल्याचे दिसून येत आहे.
चालू वर्षातील मर्सेडीज कंपनीच्या भरतीत 50% महिलांना प्राधान्य
आलिशान कार बनवणारी मर्सेडीज कंपनी चालू वर्षात जी काही नोकर भरती करणार आहे त्यामध्ये 50% जागा महिलांसाठी ठेवणार आहे. पुण्यातील चाकण येथे मर्सेडीज बेंझसोबत इतरही आघाडीच्या ऑटो कंपन्या आहेत. इंजिनिअरिंग, डिप्लोमाची अनेक महाविद्यालये पुणे ऑटो क्लस्टरमध्ये आहेत. त्यामुळे येथील मुलामुलींना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे.
टाटा कंपनी शॉप फ्लोअरवर 25% महिला कर्मचाऱ्यांची भरती करण्यावर भर देत आहे. देशभरात टाटाच्या विविध प्लांटमध्ये शॉप फ्लोअरवर साडेचार हजार महिला आधीपासून काम करत आहेत. लहान प्रवासी गाड्या, स्पोर्ट युटिलीटी व्हेइकल आणि इतरही प्रॉडक्ट लाइनवर महिला काम करत आहेत. अॅसेंबली लाइनवरील सुरुवातीपासूनची शेवटपर्यंतची सर्व प्रक्रिया महिला कर्मचारी पाहतात, असे टाटा मोटर्सचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी रविंद्र कुमार यांनी म्हटले.
महिंद्रा कंपनीकडून कॅम्पस रिक्रूटमेंटला प्राधान्य
ऑटो क्षेत्रातील आघाडीची महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडूनही महिलांना भरतीत प्राधान्य देण्यात येत आहे. विविध अभियांत्रिक महाविद्यालयातून कॅम्पस ड्राइव्हद्वारे फ्रेशर्सची निवड करण्यात येत आहे. तर एमजी मोटर्स या कंपनीत विविध इंजिनिअरिंग विभागात 37% महिला आहेत. चालू वर्षात हे प्रमाण 40% वर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे एमजी मोटर्सचे सीइओ राजीव छाब्रा यांनी म्हटले. येत्या काळात टेक्निकल फंक्शन विभागात महिलांची नेमणूक वाढवणार असल्याचे मर्सेडीज बेंन्झने म्हटले आहे.
पुणे ऑटो क्लस्टरमध्ये नोकरीच्या संधी
पुणे ऑटो क्लस्टरमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत. चाकण आणि एमआयडीसी परिसरात महिंद्रा अँड महिंद्रा, मर्सेडीज बेन्झ, व्होक्सवॅगन, फियाट, टाटा मोटर्स सह अनेक बड्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये महिलांना येत्या काळात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे अभियांत्रिक, डिप्लोमा महाविद्यालयातील शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी चालू वर्षातील नोकरभरतीवर लक्ष ठेवावे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            