World Health Day 2023: संपूर्ण जगभरात 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. मागील 2 वर्षातील कोविडचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक जण आपल्या आरोग्याविषयी जागृत राहू लागला आहे. पण त्याचबरोबर आपले आर्थिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या जगात आर्थिक मंदीचे सावट पाहायला मिळत असल्याने अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. अनेक मोठमोठ्या नामांकित कंपन्यांनी नोकरकपात करायला सुरुवात केली आहे. या सर्व गोष्टींचा आणि दैनंदिन कामाचा ताण कर्मचाऱ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक स्वास्थ्यावर होताना दिसत आहे.
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी लोक जिम, योग क्लास लावतात. पण हे सर्व करत असताना आर्थिक स्वास्थ्याचीही (Financial Health) काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. तुमचे आर्थिक स्वास्थ्य ठीक आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही स्वतःलाच 5 प्रश्न विचारून तुमचे आर्थिक स्वास्थ्य तपासू शकता. चला तर मग जाणून घेऊयात हे 5 प्रश्न काय आहेत. त्यापूर्वी आपण आर्थिक स्वास्थ्य म्हणजे नेमके काय? हे समजून घेऊ.
Table of contents [Show]
‘आर्थिक स्वास्थ्य’ म्हणजे काय?
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याबाबत आपण विशेष जागरुक असतो आणि त्यानुसार वेळोवेळी उपचार ही घेत असतो. पण आर्थिक स्वास्थ्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. ‘आर्थिक स्वास्थ्य’ हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. यामध्ये त्या व्यक्तीने केलेली पैशांची बचत, सेवानिवृत्तीनंतरचे प्लॅन आणि त्याच्या उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग आणि खर्चाचे गणित आद. मुद्द्यांचा यामध्ये विचार केला जातो.
तुमचे आर्थिक स्वास्थ्य तपासण्यासाठी ‘हे’ 5 प्रश्न नक्की विचारा
अनपेक्षित घटनांसाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या तयार आहात का?
प्रत्येकाच्या आयुष्यात काही घटना या अनपेक्षित घडतात. ज्याची तुम्ही कधीच कल्पनाही केलेली नसते. हा मुद्दा उदाहरण घेऊन समजून घेऊयात. तुमची नोकरी अचानक गेली, तर अशा परिस्थितीत नवीन नोकरी मिळेपर्यंत आर्थिक बाजू सांभाळणे गरजेचे असते. त्यासाठी प्रत्येकाने आपत्कालीन निधी (Emergency Fund) तयार करायला हवा. हा फंड तुमच्या मासिक उत्पन्नाच्या किमान सहा पट असावा. जेणेकरून बिकच परिस्थितीतही तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम राहाल.
तुम्ही बचत करता का?
तुम्ही तुमच्या मासिक उत्पन्नातून ठराविक रकमेची महिन्याला बचत (Saving) करता का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्याला मिळणाऱ्या मासिक उत्पन्नापैकी जवळपास 30 टक्के रक्कम आपण वेगवेगळ्या ठिकाणी बचत स्वरुपात गुंतवायला हवी. यातील काही रक्कम अशा ठिकाणी गुंतवावी, जी गरज लागेल तेव्हा सहज आणि पटकन काढता येऊ शकेल.
तुमच्याकडे पुरेसा आरोग्य विमा आहे का?
आजारपण हे कधीच सांगून येत नाही. तसेच या आजारपणासाठी नेमका किती खर्च येईल हे सुद्धा कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचा आरोग्य विमा (Health Insurance) काढणे गरजेचे आहे. हा विमा जास्तीत जास्त रकमेचा असेल तर उत्तम. अचानक उद्भवलेल्या आजारपणात आरोग्य विम्यातून वैद्यकीय खर्च करता येतो. ज्यामुळे तुमच्यावर अतिरिक्त पैशांचा भर पडत नाही. जर तुमच्यावर तुमचे कुटुंब निर्भर असेल, तर तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी कौटुंबिक आरोग्य विमा (Family Health Insurance) घेऊ शकता. तसेच तुम्ही घरातील कमावते असाल तर तुमचा टर्म इन्शुरन्स (Term Insurance) असणे तितकाच महत्त्वाचा आहे.
आर्थिक उत्पन्नाचे वेगवेगळे पर्याय निर्माण केले का?
एकच आर्थिक उत्पन्नाचा मार्ग असेल, तर खर्च करताना खूप विचार करावा लागतो. याशिवाय व्यक्ती त्या एकाच उत्पन्नाच्या मार्गावर अवलंबून राहते. यामुळे आर्थिक अस्थिरतेची भीती निर्माण होऊ शकते. पण तुमच्याकडे उत्पन्नाचे एकाहून जास्त मार्ग असतील, तर ही भीती राहत नाही. शिवाय जास्त मार्गांनी उत्पन्न मिळाल्याने तुम्हाला आर्थिक सुरक्षा प्राप्त होते.
आपल्या प्रत्येकालाच निवृत्तीनंतरच्या (Retirement Life) आयुष्याची काळजी वाटत असते. नोकरी करत असताना आपल्याला मासिक स्वरुपात उत्पन्न मिळते. मात्र निवृत्तीनंतरच्या उत्पन्नाचे काय? हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. सरकार आणि खासगी संस्थांकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे आर्थिक नियोजन करण्यासाठी गुंतवणूक करायला सुरुवात केली नसेल, तर लवकरात लवकर सुरुवात करा. जेणेकरून निवृत्तीनंतर आरामात आणि स्वाभिमानाने जीवन जगू शकता.
अशाप्रकारे साध्यासोप्या प्रश्नांमधून तुम्ही तुमचे आर्थिक स्वास्थ्य समजून घेऊ शकता. यातील काही प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नसतील तर त्यावर लगेच विचार करून कृती करा. कारण आतापर्यंत गेलेली वेळ पुन्हा भरून मिळणार नाही आणि अजून यात उशिर केला तर तुमचे आर्थिक स्वास्थ्य अजून क्लिष्ट होऊ शकते.