Asian Paint Water-Based Paint: रंगांची निर्मिती करणारी भारतातील सर्वांत मोठी कंपनी एशिअन पेंट्स कंपनी वर्षाला 4 लाख लीटर वॉटरबेस् कलरची निर्मिती करण्यासाठी तब्बल 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी मध्य प्रदेशमध्ये याचे उत्पादन सुरू करण्याचा विचार करत आहे. अर्थात यासाठी मध्य प्रदेश सरकारकडून अनुदान आणि इतर परवानग्या प्रस्तावाधीन आहेत. सरकारकडून सर्व परवानग्या आणि जमीन संपादित करून झाली की, 3 वर्षांत हा प्रकल्प सुरू होईल, अशी अपेक्षा एशियन पेंट्सकडून शनिवारी (दि. 7 जानेवारी) व्यक्त करण्यात आली आहे.
एशियन पेंट्स कंपनीची शुक्रवारी (दि. 6 जानेवारी) याबाबत कंपनीच्या बोर्डाची बैठक झाली होती. या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देऊन यासाठी 2 हजार कोटींची गुंतवणूक करण्यासा मान्यता देण्यात आली. सध्या कंपनीची प्रत्येक वर्षाला 1,700 मिलिअन लीटर रंग उत्पादनाची क्षमता आहे. यापूर्वी म्हणजे ऑक्टोबर, 2022 मध्ये कंपनीने पुढील 3 वर्षांच्या नियोजनासाठी 6,750 कोटी रुपयांची योजना आखली आहे. त्यामध्ये 3,400 कोटी रुपये डेव्हलपमेंटसाठी, 2,550 कोटी रुपये इतर उद्योगांच्या एकत्रिकरणासाठी आणि जमीन संपादित करण्यासाठी 800 कोटी रुपये राखीव ठेवले होते. त्याव्यतिरिक्त या नवीन प्रकल्पासाठी कंपनीने 2 हजार कोटी रुपयांचा निधी उभा करण्याचे निश्चित केले आहे.
कंपनीने विनाईल एसीटेट इथिलीन इनल्सन (Vinyl Acetate Ethylene Emulsion-VAE) आणि व्हाईट सिमेंटसोबत इतर कच्च्या मालाच्या प्रोडक्शनसाठी 2,650 कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर कंपनीने हरिंद केमिकल्स आणि फार्मास्युटीकल (Harind Chemicals & Pharmaceutical) कंपनीचा हिस्सा विकत घेण्यासाठी बोलणी व करार केले होते. याशिवाय व्हाईट सिमेंट आणि क्लिंकरच्या उत्पादनासाठी कंपनीने करारही केला होता.
दरम्यान, आदित्य बिर्ला ग्रुपमधील कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीने 2025 पर्यंत पेंट्सच्या उद्योगा 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे पेंट उद्योगात असलेल्या कंपन्यांमध्ये येत्या काळात चांगलीच स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ग्रासिम कंपनीने यापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी मे आणि जानेवारी महिन्यात गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. यावेळी कंपनीने निर्धारित केलेल्या गुंतवणुकीपेक्षा दुप्पट गुंतवणुकीची घोषणा केली होती. यावरून या क्षेत्रातील स्पर्धा लक्षात येते. 2019 मध्ये जेएसडब्ल्यू ग्रुपनेही या क्षेत्रात उडी मारली. JSWने कॉईल कोटिंगपासून सुरूवात करत पेंट्समध्ये शिरकाव केला आहे. याचबरोबर Kansai Nerolac Paints आणि Indigo Paints या कंपन्याही या उद्योगात पूर्वीपासून आहेत.