Asian Paints Q4 result: भारतातील आघाडीची पेंट निर्मिती कंपनी एशियन पेंट्सने आज (गुरुवार) तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात मागील वर्षीच्या तुलनेत 44% वाढ झाली आहे. 2023 आर्थिक वर्षातील शेवटच्या म्हणजेच जानेवारी-मार्च तिमाहीत 1,234.14 कोटी रुपये नफा झाला. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 850.42 रुपये नफा झाला होता.
भागधारकांना लाभांश जाहीर
कंपनीने भागधारकांना प्रतिशेअर 21.25 रुपये नफा जाहीर केला आहे. सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाल्यानंतरच हा लाभांश वितरित केला जाईल. सुशोभीकरण आणि नॉन ऑटोमोटिव्ह क्षेत्रात कंपनीचा व्यवसाय चांगला झाला. त्यामुळे कंपनीला दोन अंकी वाढ नोंदवता आली, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सेनगल यांनी म्हटले.
पेंट व्यवसायात 50% वाटा
तिमाही निकाल जाहीर होताच एशियन पेंट्सचा शेअर्स 3.34% वाढून 3,143 वर गेला. मागील 52 आठवड्यात 3,582 एवढा सर्वाधिक वर गेला होता. तर मागील 52 आठवड्यात 2,560 पर्यंत खाली आपटला होता. बर्जर इंडिगो, शालिमार, Akzo Nobel India या कंपनीच्या प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, पेंट व्यवसायात कंपनीचा वाटा 50% पेक्षा जास्त आहे.
कच्च्या मालाच्या किंमती उतरल्याने नफा वाढला
नुकत्याच संपलेल्या तिमाहीत आणि मागील संपूर्ण वर्षात नफ्याचे प्रमाण वाढले. मागील काही दिवसांत कच्च्या मालाच्या किंमती खाली आल्या आहेत. त्याचा कंपनीला फायदा झाला. गृह सुशोभीकरण व्यवसायातील फॅब्रिक, लाइटिंग, दरवाजे आणि खिडक्या या उत्पादनांची चांगली विक्री झाली. मात्र, किचन आणि बाथरुम सेगमेंटमधील व्यवसाय रोडावला. एकंदर विचार करता जागतिक स्तरावरील व्यवसाय चांगला राहीला. मध्यपूर्व आणि आफ्रिका खंडातील व्यवसाय सुधारला तर एशिया विभागात समाधानकारक प्रगती झाली नाही, असे सीइओ अमित सेनगल यांनी म्हटले.
सोबतच इंडस्ट्रियल कोटिंग व्यवसायातही वृद्धी झाली. मंदीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील व्यवसायातील वाढ 3 टक्क्यांनी खाली आली. ग्राहकांची मागणी कमी असल्याने बाथरुम फिटिंग आणि किचन सुशोभीकरण व्यवसाय रोडावल्याचेही सेनगल यांनी सांगितले.