तुम्ही जेव्हा डिजिटल पेमेंट करतो किंवा ऑनलाईन शॉपिंग, व्यवहार करतो तेव्हा आपण बऱ्याचवेळा कॅशबॅक ऑफर किंवा रिवार्डसचा (Cashback Offer or Reward) पर्याय पाहतो. कदाचित तुम्ही त्या ऑफरचा लाभही घेतला असेल. पण सरसकट ग्राहकांचा विचार केल्यास कॅशबॅक ऑफर ही एक चांगली डील ठरते का? कॅशबॅकच्या मदतीने खरेदी केल्यास खरंच लाभ मिळतो का? असे काही प्रश्न उपस्थित होतात.
सर्वप्रथम कॅशबॅक ऑफर्स (Cashback Offers) काय असतात? हे आपण जाणून घेऊ. कॅशबॅक ही प्रथमदर्शनी ऑनलाईन सेलरकडून दिलेली सवलत असते. ऑनलाईन सेलर, शॉपिंग वेबसाईटस्, क्रेडिट कार्ड कंपन्या एवढंच नाही तर बँकादेखील ई-वॉलेटच्या मदतीने कॅशबॅकची सवलत देतात. प्रॉडक्टवर दिल्या जाणाऱ्या डीलवरील सवलतीबरोबरच दिली जाणारी ही एक अतिरिक्त सवलत आहे. अर्थात ही अतिरिक्त सवलत किंवा कॅशबॅक (Discount or Cashback) काही अटींची पूर्तता केल्यावरच मिळते.
ऑफर देणारी कोणतीही कंपनी ही अन्य दुसर्या कंपनी किंवा रिटेलरशी पार्टनरशीप करते आणि आपल्या कमीशनमधील काही भाग ग्राहकांना डिस्काऊंटच्या रुपाने देत असते. अशाप्रकारच्या सवलतीच्या मदतीने कंपन्या ग्राहकांना आपल्या वेबसाईटकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. एकपरीने या कंपन्या अशा ऑफर देऊन ग्राहकांना शॉपिंग करण्यासाठी आणि पैसे खर्च करण्यासाठी उत्तेजित करत असतात. वास्तविक कॅशबॅक ऑफर ही कंपन्यांसाठी एक मार्केटिंगचा भाग आहे. तरीही ग्राहकांना या सवलतीचा फायदा मिळत नाही, असे नाही. अनेक वेबसाईटवर किंवा डील्सवर प्रत्यक्षात कॅशबॅक ऑफरचा वापर करत स्वस्तात शॉपिंग करता येते. मात्र कॅशबॅक ऑफरचा लाभ घेताना काही गोष्टींची माहिती असणे गरजेचं आहे.
कॅशबॅक ऑफर पाहून खरेदी करू नका!
कॅशबॅकची ऑफर पाहिली आणि लगेच ते प्रॉडक्ट अॅड टू कार्ट केले, पेमेंट केले आणि शॉपिंग डन, असं चुकूनही करू नका. कधीही कॅशबॅकची ऑफर पाहून खरेदीच्या मोहात पडू नका. तुमच्या खरेदीच्या क्षमतेवर ऑफरचा प्रभाव होऊ देऊ नका. अशाप्रकारे एखाद्या वस्तुची खरेदी करणे हा शहाणपणा ठरत नाही. संबंधित प्रॉडक्टची तुम्हाला खरंच गरज आहे की नाही, हे सतत तपासून पाहा. तसेच तुमच्या अपेक्षेनुसार कॅशबॅक ऑफर मिळते की नाही, ही डील खरंच फायद्याची ठरतेय का? याचा आढावा घ्या आणि मगच ती खरेदी करा.
गरजेपेक्षा अधिक खर्च तर नाही ना!
ग्राहकांनी जास्ती जास्त पैसा खर्च करावा, अशी कंपनीची इच्छा असते. त्यामुळे अनेक कंपन्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स देऊन त्यात गुंतवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तुम्ही जर या ऑफरच्या जाळ्यात अडकलात तर तुम्ही बचतीपोटी जमा केलेले पैसे वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगायचे तात्पर्य एवढेच की, चांगल्या ऑफर्सची नीट माहिती घ्या. कंपनीकडून दिली जाणारी ऑफर खरंच फायद्याची आहे की नाही, याचा विचार करा आणि मगच कॅशबॅक ऑफरच्या डील्सचा विचार करा.